अब्दुल हादीच्या घराची झडती; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:12 PM2022-09-24T13:12:42+5:302022-09-24T13:13:18+5:30
जालन्यात पीएफआयवर धाड : पोलिसांकडून लाठीमार
लाेकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अब्दुल हादी अब्दुल मोमीन या पीएफआय या संघटनेच्या खजिनदारास एटीएसने गुरुवारी जळगाव येथे अटक केली होती. त्या संशयितास शुक्रवारी दुपारी जालन्यात आणून त्याच्या घराची झडती घेतली. या वेळी लॅपटॉपसह अन्य कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी पीएफआयच्या समर्थकांनी रेहमानगंज या भागात निदर्शने करून अब्दुलच्या घराची झडती घेण्यास विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे सांगण्यात आले.
पीएफआय या संघटनेच्या जालन्यासह अन्य ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली होती. त्यात जालन्यातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जालन्यातील पीएफआय या संघटनेचा सक्रिय पदाधिकारी अब्दुल मोमीन रौफला जळगाव येथे अटक केल्यावर दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात दुपारी साडेतीन वाजता जालन्यातील रहेमानगंज येथील अब्दुल रौफ मोमीन याच्या घराची तपासणी करण्यासाठी एटीएसच्या पथकातील काही अधिकारी हे त्याला घेऊन हजर झाले होते. हे कळताच परिसरातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या परिसरात जमा होऊन कारवाईस विरोध करत होते. अब्दुल रौफ मोमीन हा निर्दोष असून, त्याला सोडून द्यावे, अशा घोषणा देत होते. प्रथम पोलिसांनी या जमावाला शांत राहून आम्हांला आमचे काम करू द्या, असे सांगितले. परंतु जमाव शांत होत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.
पीएफआयकडून निदर्शने
देशात आणि राज्यात एनआयए आणि एटीएसने केलेल्या कारवाई विरोधात शुक्रवारी दुपारी मामा चौकात अचानक निदर्शने केली. ही निदर्शने करताना कुठलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या निदर्शनाचे फुटेज तपासून दोषींवर नंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.