सीडपार्कच्या जमिनीचे मोजमाप पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:36 AM2018-01-17T00:36:14+5:302018-01-17T00:36:20+5:30
पानशेंद्रा शिवारातील सीडपार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक नऊमधील जमिनीचे मोजमाप मंगळवारी स्थानिक नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पानशेंद्रा शिवारातील सीडपार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक नऊमधील जमिनीचे मोजमाप मंगळवारी स्थानिक नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जालना येथे पानशेंद्रा शिवारात होत असलेल्या सीडपार्कसाठी महसूल प्रशासनाने तीस हेक्टर शासकीय गायरान जमीन संपादित केली आहे. या जमिनीेचे मोजमाप करून ती औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. मात्र ही गायरान जमीन शासनाने कसणा-यांच्या नावाने नियमित केल्याचे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. बहुतांश ठिकाणी जमिनीवर शेती करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाने मोजमाप केलेल्या जमिनीवर खुणा रोवून, सर्व बाजंूनी चारी खोदण्याचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. मंगळवारी दुपारी तहसीलदार विपिन पाटील हे पथकासह या ठिकाणी पोहोचले. मात्र, काही नागरिकांसह महिलांनी ही गायरान जमीन आमच्या नावाने असल्याचे सांगत चारी खोदण्याचे काम बंद पाडले. अधिका-यांनी स्थानिकांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या. मात्र, स्थानिकांकडे कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी मोजणी अधिका-यांना स्थानिकांची कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे चारी खोदण्याचे काम थांबविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.