सहा हजार बनावट पॅकिंग पॉकेट्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:41 AM2018-04-28T00:41:32+5:302018-04-28T00:41:32+5:30
बनावट कपाशी बियाणे प्रकरणी केलेल्या कारवाईचे धागेदारे ेथेट गुजरातपर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बनावट कपाशी बियाणे प्रकरणी केलेल्या कारवाईचे धागेदारे ेथेट गुजरातपर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून बनावट पॅकिंग पॉकेट्सचा पुरवठा करणाऱ्या संशयित मुकुंद रमनलाल पटेल यास पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास दोन मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील अन्य चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभागाच्या पथकाने दि. १९ एप्रिलरोजी जुना जालन्यातील कचेरी रोड परिसरातील कल्पेश शांतिलाल टापर याच्या घरात छापा टाकून ६४ लाख, ४२ हजारांचे कपाशी व भाजीपाल्याचे बनावट बियाणे जप्त केले होते. बनावट बियाणे विक्री प्रकरणात सहभाग असणा-या संशयित बाबासाहेब प्रल्हाद वाढेकर (रा. जामवाडी) व हरिदास बाजीराव निहाळ (रा. चनेगाव) यांनाही पोलिसांनी जामवाडी व चनेगाव येथून ताब्यात घेतले होते. तर बदनापूर तालुक्यातील चिखली येथून संशयित बबन धोंडिबा कदम (५५) नऊ लाखांच्या बनावट बियाण्यांसह अटक करण्यात आली होती. चारही संशयितांना न्यायायलाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीत टॉपर याने बियाणे पॅकिंगसाठी लागणारी नामांकित कंपन्यांची हुबेहुब दिसणारी पॉकिटे गुजरातमधील अहमदाबाद येथील संशयित मुकुंद रमनलाल पटेल (३७) याच्याकडून आणल्याचे सांगितले. या पाकिटांवर किंमत व अन्य माहिती छापली जात होती. गुन्हे शाखेच्या एका पथकाने थेट अहमदाबाद येथे जावून मुकुंद पटेल यास ताब्यात घेतले. त्याच्या घराशेजारीच असलेल्या कार्यालयातून पोलिसांनी सहा हजार ३९० बियाणे पॅकिंगसाठी लागणारी पाकिटे जप्त केले. पाकिटावर कुठल्याही कंपनीचे नाव नसले तरी रंग व आकार हुबेहुब नामांकिंत कंपन्यांच्या बियाणे पॉकिटांसारखाच आहे. पोलिसांनी संशयित पटेल यास शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास दोन मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मूळ बनावट बियाणे कोठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत.दरम्यान, या प्रकरणी शुक्रवारी पोलीस कोठडी संपत असलेल्या वरील चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केलेला संशयित मुकुंद पटेल हा कपाशी व अन्य बियाणे पॅकिंगसाठी लागणारी पॉकिटे तयार करणा-या एका कंपनीत काम करत होता. त्यामुळे त्याला पाकिटांचा आकार रंगछटा व अन्य बाबींची बारकाईने माहिती होती. त्यातुनच तो इतरांच्या मदतीने बनावट पॅकिंग पॉकिटे तयार करत असावा, असा संशय आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे बियाणे पॅकिंगची पॉकिटे हैदराबाद, अहमदाबाद व गोवा येथील कंपन्यांमध्ये केवळ आॅर्र्डरनुसारच तयार करून दिली जातात.