चोरटी दारूविक्री; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:34 AM2019-03-15T00:34:08+5:302019-03-15T00:34:22+5:30
विदेशी मद्याच्या १८ बाटल्या तर देशी दारूच्या १६२ बाटल्या आढळून आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात अवैध मार्गाने दारूची वाहतूक करणे अथवा साठा करण्यावर बंधने घालण्यात आली आहे.
असे असताना गुरुवारी दुपारी औद्योगिक वसाहत भागातील गेडोर टी पॉर्इंटवर एका दुचाकीच्या डिकीतून अवैध दारू वाहून नेत असल्याची गुप्त माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली. यावरून कृष्णा भडांगे यांनी ही माहिती लगेचच पोलीस निरीक्षक कोठाळे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार सापळा लावण्यात आला. एका स्कूटीमधून (एम.एच.२१ एएन १४९१) देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती. दुचाकीस्वाराची झाडाझडती घेतली असता त्याचे नाव गणेश दामोदर पिसाळ असे सांगितले. तो जुना जालना भागातील भवानीनगर येथील रहिवासी आहे. विदेशी मद्याच्या १८ बाटल्या तर देशी दारूच्या १६२ बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणी पिसाळ यास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती कृष्णा भडांगे यांनी दिली. याचा अधिक तपास चंदनझिरा पोलिस ठाण्यातील जमादार शिंदे हे करीत असल्याचे सांगण्यात आले. अशा अवैध वाहतूक करणाऱ्यांवर बारकाईने नजर राहणार आहे.