टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:01+5:302021-01-25T04:32:01+5:30
टेंभुर्णी : सध्या टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. यात टोमॅटोवर झालेला खर्चही वसूल होत नसल्याने टेंभुर्णी परिसरातील ...
टेंभुर्णी : सध्या टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. यात टोमॅटोवर झालेला खर्चही वसूल होत नसल्याने टेंभुर्णी परिसरातील उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
टेंभुर्णी परिसरात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. एरव्ही टोमॅटोचे २० किलो वजनाचे कॅरेट ठोक दराने २०० ते ४०० रुपयांपर्यंत विकले जात होते. सध्या एका कॅरेटला ४० ते ६० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत नाही. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल तुडविण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा टोमॅटो शेती पूर्णत: तोट्यात गेल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या शेताशेतांतून तोडणीला आलेले लालबुंद टोमॅटो तोडणीविना पडून असल्याचे दिसून येत आहे. वरखेडा फिरंगी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी दत्ता जाधव म्हणाले, मी यावर्षी दोन एकर क्षेत्रांवर टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो चांगले आल्याने मला जवळपास ४ हजार कॅरेट टोमॅटो मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु, सध्या एक कॅरेटला ४० ते ६० रुपयांपेक्षा जास्त दर नसल्याने तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
फोटो ओळ : टोमॅटोला चांगला दर मिळत नसल्याने शेतातच टोमॅटो फेकून दिले जात आहेत.