‘सेनेने युती केली नाही तरी भाजपाच अव्वल’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:44 AM2019-01-26T04:44:50+5:302019-01-26T04:45:27+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे.
जालना : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. युती झाली नाही तरी राज्यात भाजपाच अव्वल राहील, असा दावा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला.
आपण आतापर्यंत ४६ मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असून निवडणुकीचा आढावा घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सोमवारी जालन्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असून, यासाठी सर्व मंत्री तसेच १२०० प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर बैठकीस उपस्थित राहतील. जागा वाटपासंदर्भात आमची अद्याप एकही बैठक झाली नसल्याचे दानवे यांनी सांगितले. युतीबाबत आम्ही आग्रही आहोत. परंतु त्यांच्याकडून अद्याप तरी कुठलाच निर्णय कळविण्यात आलेला नाही. युती होईल यावर आमचा विश्वास आहे, असेही दानवे म्हणाले.