ट्रॉन्सफार्मर बदलण्यासाठी लाच मागणारा वरिष्ठ तंत्रज्ञ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 07:27 PM2018-05-11T19:27:31+5:302018-05-11T19:27:31+5:30
नादुरुस्त विद्युत ट्रॉन्सफार्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कन्हैय्यानगर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
जालना : नादुरुस्त विद्युत ट्रॉन्सफार्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कन्हैय्यानगर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कन्हैय्यानगरातील एका हॉटेलात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. पंडित दीपा राठोड (४५,रा. योगेशनगर) असे लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्यांची अंबड तालुक्यातील गोंदीतांडा शिवारात जमीन आहे. शेतातील विद्युत ट्रॉन्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांने नादुरुस्त ट्रॉन्सफार्मर महावितरणच्या जालन्यातील कन्हैय्यानगर विभागात जमा केला होता. त्यानंतर येथील वरिष्ठ तंत्रज्ञ पंडित राठोड याची भेट घेवून ट्रॉन्सफार्मर बदलून देण्याची विनंती केली होती. पंडित राठोड याने या कामासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पैसे दिले नाही तर काम होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत राठोड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
आज दुपारी कन्हैय्यानगरातील एका हॉटेलजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पंडित राठोड यास पाच हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. त्याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, संतोष धायडे, गंभीर पाटील, संदीप कुदर, महेंद्र सोनवणे, रामचंद्र कुदर, ज्ञानेश्वर म्हस्के, आगलावे, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.