विहिरीत पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:53 PM2019-09-16T18:53:13+5:302019-09-16T18:54:40+5:30
सकाळी खेळण्यासाठी घरातून निघालेला मुलगा परत आलाच नाही
भोकरदन (जालना ) : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एक ११ वर्षीय मुलगा रविवारी (दि. १५ )सकाळी १० वाजेपासून बेपत्ता होता. तब्बल १३ तासाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह घराजवळील एका विहिरीत आढळून आला. दीपक देविदास गावंडे असे मृत मुलाचे नाव आहे.
या बाबतची माहिती अशी की, दीपक गावंडे हा रविवारी सकाळी 10 वाजता खेळण्यासाठी जातो म्हणून घरातून निघाला. तर त्याचे आईवडील शेतातील कामात गुंतले. ते सायंकाळी घरी आले असता त्यांना दीपक आढळून आला नाही. यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. शेवटी घराजवळील एका विहिरीत पडल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी ६ विद्युत मोटारीच्या सहाय्याने उपसा केला. रात्री उशिरा दीपकचा मृतदेह विहिरीतील तारेस अडकलेला आढळून आला. दीपक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी वर्गात शिकत होता. सोमवारी सकाळी पारध पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.