शहरात गावठी पिस्तूल आढळण्याचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:49 AM2020-02-18T00:49:07+5:302020-02-18T00:49:44+5:30
गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली. पोलिसांनी पिस्तूल, कारसह एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या सुनील वनारसे याने ही पिस्तूल पुरवठा केल्याचे समोर आले आहे.
गावठी पिस्तूल बाळगणारा युवक एका कारमधून जात असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना माहिती देऊन त्यांच्यासह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील घृष्णेश्वर चौकात सापळा रचला. त्यावेळी मंठा चौफुलीकडून भरधाव वेगात आलेल्या कारला (क्र. एम. एच. २२- ए. एम. १६१३) थांबविण्यात आले. आतील विकास जयराम शिंदे (रा. पांगारकर नगर, जालना), किशोर दामोदर घुगे (रा. स्वामी समर्थ नगर, जालना) या दोघांची चौकशी केली. त्यावेळी विकास शिंदे याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. त्याच्याकडील पिस्तूल, कारसह मोबाईल, काठी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिस्तूल खरेदीबाबत विचारणा केल्यानंतर ती पिस्तूल सुनील वनारसे (रा. नूतन वसाहत, जालना) याच्याकडून ३० हजार रूपयांमध्ये खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोनि संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, पोलीस कर्मचारी संदीप बोन्द्रे, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, साई पवार, सोपान क्षीरसागर, फुलचंद गव्हाणे, स्वप्नील साठेवाड, जतीन ओहोळ यांच्या पथकाने केली.
गावठी पिस्तूल आयातीचा पत्ता मिळेना
पोलिसांनी गत काही महिन्यात जवळपास १२ गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. यातील अनेक पिस्तूल सुनील वनारसे याने विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वनारसे विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. मात्र, विविध गुन्ह्यातील तपासामध्ये वनारसे याने विक्री केलेले किंवा इतर आरोपींनी वापरलेल्या गावठी पिस्तुले आणली कोठून, याचा पत्ता लागलेला नाही. काही राज्यात पथकेही गेली. मात्र, मिळालेली माहिती चुकीची असल्याचे तेथे गेल्यानंतर पथकाच्या लक्षात आले.
दोघांनी पळून जाण्याचा केला होता प्रयत्न
पोलिसांनी घृष्णेश्वर चौकात नाकाबंदी केली होती. पोलिसांनी केलेली नाकाबंदी पाहून कार चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची काटेकोर नाकाबंदी असल्याने ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.