स्टील कंपनी अपघातातील मृतांची संख्या सातवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:30 AM2020-03-07T00:30:23+5:302020-03-07T00:30:41+5:30

औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला

Seven killed in steel company accident | स्टील कंपनी अपघातातील मृतांची संख्या सातवर

स्टील कंपनी अपघातातील मृतांची संख्या सातवर

googlenewsNext

जालना : जालना येथील औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. याबाबत औद्योगिक सुरक्षा संचालकांनी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात गंभीर त्रुटी असल्याचा ठपका कंपनीवर ठेवला आहे. याबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत रामदेव पंडित (३१), अजयकुमार रामसकाल सहानी (२२), रामहितसिंग सिंग (२०), अनिलकुमार ललन ओझा (१९), राकेश रामप्रताप पाल (२६), राजकुमार अशोककुमार सिंग (२५), प्रदीपकुमार रामजी यादव (२५ उत्तरप्रदेश, बिहार) अशी मयतांची नावे आहेत.
जालना शहरातील अतिरिक्त एमआयडीसीत ओमसाईराम ही भारूका परिवाराची स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत गुरुवारी लेडरमधील गॅसकोंडीमुळे भट्ठीतील तप्त लोहरस कामगारांच्या अंगावर पडला होता. या घटनेत रामहितसिंग सिंग, भारत रामदेव पंडित, अजयकुमार रामसकाल सहानी या तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
औरंगाबादेत उपचार सुरू अनिलकुमार ललन ओझा, राकेश रामप्रताप पाल, राऔद्योगिकजकुमार अशोककुमार सिंग, प्रदीपकुमार रामजी यादव या शुक्रवारी मृत्यू झाला. तर जखमी प्रदीप प्रमोदकुमार राई (२४), मोद मोझमिल अबू निसार (२०), संजिवकुमार आनंद राय (२०), अनिलकुमार नंदूराम (३४) या जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ठेकेदाराने दिली तक्रार
या प्रकरणात गुरुवारी रात्री ठेकेदार अनिलकुमार नंदुराम (उत्तरप्रदेश) यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून कंपनीच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कंपनीचे मालक राजेंद्र सत्यनारायण भारूका (अजंतानगर, जालना), संचालक जवाहर शंकरलाल डेंबडा (गोपीकिशननगर, जालना), प्रतीक रमेशचंद्र गोहेल (रा. व्यंकटेशनगर, जालना), सुनील सिंग शिवानंद (रा. चंददेवरा ता. लालगंज जि. आजम उत्तर प्रदेश, ह. मु. जालना), शेख जावेद शेख मनू (रा. सत्यमनगर चंदनझिरा, जालना), विनोद नरेंद्र रायवय (रा. पावडा ता. गुराबा सापुर उत्तर प्रदेश, ह.मु. जालना) या सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीन झाल्याचे तपासाधिकारी कोठाळे यांनी सांगितले.
औद्योगिक सुरक्षा संचालकांकडून पाहणी
शुक्रवारी औरंगाबाद येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक राम दहिफळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक, कामगार अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी काही कामगारांशी त्यांनी संवाद साधला. परंतु, जे कामगार जखमी आहेत ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने यातून निष्कर्ष निघाला नसल्याचे दहिफळे यांनी सांगितले.
कामगार संघटनेकडून चौकशीची मागणी
सिटूचे कामगारनेते आण्णा सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेतली. त्यांनी कंपनीतील अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. हे स्टील उद्योजक कमी जागेत सर्व उत्पादन करतात. त्यामुळे अपघात होत असल्याचे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच हव्या त्या सुरक्षा पुरवत नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार चौकशी होईल असे आश्वासन बिनवडे यांनी सिटूच्या शिष्टमंडळाला दिले.
बकेटच्या छिद्रातून गॅस पास न झाल्याने अपघात
लोखंडी बिलेट तयार करून त्यानंतर त्याला साच्यात टाकून नंतर लोखंडी सळयांची निर्मिती केली जाते. यासाठी असलेल्या भट्टीत -फर्नेसमध्ये जवळपास १२०० ते १६०० एवढ्या उच्च तापमानात लोखंडाचे पाणी होते. हे पाणी एका बकेटमधून साच्यात ओतताना हा अपघात झाला. या बकेटमधून गॅस बाहेर पडण्यासाठीचे छिद्र ब्लॉक झाल्याने हे पाणी उसळून वर येऊन ते बकेटबाहेर पडल्याने ही दुर्घटना घडली.
औरंगाबादेतील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, अन्य दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रदीप राय ९७ टक्के आणि मुज्जमील खान ९६ टक्के भाजले असून, दोघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.
कामगार भेदरलेले
रु ग्णलयाबाहेर अन्य काही कामगार उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेमुळे ते भेदरून गेल्याचे दिसून आले. घटनेविषयी काही सांगणेही त्यांना कठीण जात होते. काहींना भावनाही अनावर झाल्या होत्या.
अहवाल सादर
शुक्रवारी औरंगाबाद येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक राम दहिफळे यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना सायंकाळी सादर केला. बिनवडे यांनी हा अहवाल कामगार आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले. या अहवालात कंपनीत काम करणा-या कामगारांच्या सुरक्षेकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नसल्याचे आणि कामगारांना जीव गमावण्यासह गंभीर दुखापती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Seven killed in steel company accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.