शासकीय समित्यांमधील शिवसेनेच्या सात सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:55+5:302021-03-13T04:54:55+5:30
जालना : नुकत्याच जाहीर झालेल्या विविध शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला योग्य स्थान न मिळाल्याने सेनेचे सदस्य नाराज झालेे आहेत. घनसावंगी ...
जालना : नुकत्याच जाहीर झालेल्या विविध शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला योग्य स्थान न मिळाल्याने सेनेचे सदस्य नाराज झालेे आहेत. घनसावंगी मतदारसंघातील सात सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे शिवसेना नेते हिकमत उढाण यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविले आहेत.
जालना जिल्ह्यात नुकत्याच विविध शासकीय समित्यांवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत करण्यात आल्या. मात्र, या समित्यांमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद असूनही स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे एकही अध्यक्षपद दिले गेले नाही. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली. दि. ११ मार्च रोजी घनसावंगी येथील जनसंपर्क कार्यालयात या विषयावर शिवसेना नेते हिकमत उढाण, तालुका प्रमुख उद्धवराव मरकड यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी जि. प. सदस्य अन्सीराम कंटुले, खालद कुरेशी, तक्कमी पाशा, शिवाजीराव शिवतारे, शंकरराव बेंद्रे, मधुकरराव साळवे, रणजित उढाण, डॉ. अशोक गोडसे, प्रल्हादराव वराडे, अनिरुद्ध शिंदे, विठ्ठलराव खैरे, पंढरीनाथ उगले, रमेश बोबडे, अशोक उदावंत, प्रभाकर धांडे, अशोक शेलार उपस्थित होते. चर्चेतून बापूराव आर्दड, मधुकर साळवे, लता मिसाळ, रावसाहेब रेडे, बाबूराव साबळे, रामेश्वर काळे, राम बिडे या सदस्यांनी राजीनामे देण्याचे ठरविले. वरील सात सदस्यांनी आपले राजीनामे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविले आहेत.