जिल्ह्यातील एकाहत्तर मुले शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:04+5:302021-04-15T04:29:04+5:30
जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ...
जालना : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गत महिन्यात जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. कोरोनामुळे या शोध मोहिमेला मोठा फटका बसला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गत महिन्याच्या प्रारंभीच शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे काही दिवस ही मोहीम ठप्प होती. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाळेतील शिक्षकांनी ही शोध मोहीम जिल्हाभरात राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील ७१ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. शाळाबाह्य मुले राहू नयेत, सर्वांनी शिक्षण घ्यावे, लॉकडाऊन शिथिलतेनंतर शाळा सुरू झाल्या की मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
जालना ००
अंबड २८
बदनापूर ००
भोकरदन ०१
घनसावंगी १७
जाफराबाद ०७
मंठा १८
परतूर ००
३१ मुले शाळेपासून दूरच
शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत जिल्ह्यातील ३१ मुले आजवर शाळेतच गेली नसल्याचे समोर आले आहे. यात घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ११, अंबड तालुक्यात ७, जाफराबाद तालुक्यात सात व मंठा तालुक्यात सहा मुले आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सर्व शाळेतील शिक्षकांचा सहभाग
शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता. कोरोनातील सूचनांचे पालन करून हे सर्वेक्षण राबविण्यात आले. परंतु, या मोहिमेला यावर्षी कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. जालना व बदनापूर तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल शोध मोहिमेत आढळलेले नाही.
अंबड तालुक्यात सर्वाधिक मुले
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत अंबड तालुक्यातील सर्वाधिक २१ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यात ७ मुले कधीच शाळेत न गेलेली तर २१ मुले ३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर असलेली आढळून आली आहेत. या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर नियमित शाळेत यावे, याबाबत शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.
कोरोनातील सर्वच सूचनांचे पालन करून शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. या मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या मुलांनी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत यावे, यासाठी पालकांची जनजागृती करण्यात आली आहे.
-कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी
३० दिवसांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर राहिलेली मुले. ४०