केदारखेडा, कानडी येथे नदीपात्राची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:28 AM2018-06-19T00:28:03+5:302018-06-19T00:28:03+5:30
पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथिल पुर्णा नदी पात्रात भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक सुरु आहे़ पंरतु याकडे महसूल आणि पोलीस खात्याचे सोयस्कर दुर्लक्ष दिसत आहे़ वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.
पूर्णच्या नदीपात्रातील वाळूची अद्यापही लिलाव झालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून नदीपात्रातून ट्रॅक्टरव्दारे वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम भरदिवसा वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ या वाळूची भरदिवसा वाहतूक केली जात आहे़ परंतु याकडे महसूल विभागाचे किंवा पोलीस खात्याचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी ढुंकूनही पाहायाला तयार नाही़ यावरुन संबधित अधिकाऱ्याचे व वाळू माफियांचे आर्थिक हितसंबध असल्याची चर्चा सर्वसामन्यात सुरु आहे़ भर दिवसा सुरु असलेली वाळूची तस्करी अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना यात लक्ष घालावे कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे मात्र पूर्णा नदीचे पात्र पोखरले जात आहे़ यामुळे पर्यावरणाचा मोठा -हास होत आहे. असूनही याकडे सोयीस्कर होत असलेला कानाडोळा महसूल व पोलीस खात्याच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहे़
ग्रामस्थांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार
तळणी : मंठा तालुक्यातील कानडी, लिंबखेडा , टाकळखोपा, वाघाळा, किर्ला, देवठाणा, भुवन येथील स्थानिक वाहनधारक थेट पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचे वाळूचा साठा करून वाळूची विक्री करण्यात येत आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
विशेष म्हणजे वाळूची चोरी व साठवण करणा-या वाहनधारकांवर तलाठी , मंडळ अधिका-याबरोबरच वरिष्ठ अधिकारीही मेहेरबान असल्याचक तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक वाहनधारक नदीत उतरविण्यासाठी रस्ते तयार करुन लिलाव न झालेल्या ठिकाणाहून अवैधरीत्या वाळू उपसा, चोरी व साठा करीत आहे.
हा सर्व प्रकार तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदाराना ज्ञात असतानाही महसूल विभाग वाळूमाफियांवर मेहेरबान का ? अवैध वाळूच्या उपशाकडे दुर्लक्ष का ? सगळं काही उघडपणे सुरु असूनही तेरी भी चूप मेरी भी चूप का ? हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी वारंवार तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी रंगनाथ लोमटे, विष्णू राऊत, सुरेश चट्टे, वसंत सरोदे, आत्माराम जाधव यांनी केली आहे.यावर आता काय निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.