भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 05:59 PM2019-01-12T17:59:40+5:302019-01-12T18:00:15+5:30
शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
पारध (जालना ) : भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.
पारध खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना १९६० मध्ये झाली होती. येथे इयत्ता पहिली ते आठपर्यंतचे १३४ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत आठ वर्गखोल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर दोन वर्गखोल्यावरील पत्रे अचानक कोसळली. सुदैवाने शाळेत कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समिती भोकरदन व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या घटनेमुळे शिक्षण विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
दुरुस्तीची मागणी
दरम्यान, या खोल्याजवळ कायम विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे या वर्ग खोल्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आम्ही अनेकवेळा प्रशासनाकडे वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून, आता तरी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच आर. आर. पाटील यांनी केली आहे.