शहागड येथे महिलेवर पाळत ठेवून पर्स पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:39 AM2019-12-02T00:39:06+5:302019-12-02T00:39:24+5:30
कापड दुकानात गेलेल्या महिलेची पर्स चोरून चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : कापड दुकानात गेलेल्या महिलेची पर्स चोरून चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी दुपारी शहागड (ता.अंबड) येथील बसस्थानकासमोरील दुकानात घडली.
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ममता बद्रीनाथ शिंदे या रविवारी सकाळी त्यांच्या पतीसमवेत खासगी वाहनातून जालना येथे लग्न कार्यासाठी जात होत्या. शहागड (ता.अंबड) येथे उतरून बसस्थानक समोरील एका कापड दुकानातून कापड खरेदी करण्यासाठी त्या गेल्या. दुकानात जाऊन कापडांची पाहणी त्या करीत होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला व मुलगी दुकानात आली. शिंदे यांच्या जवळ उभे राहून कापडांची विचारपूस केली. मात्र, खरेदी न करता त्या दोघी निघून गेल्या. त्यानंतर काही वेळातच आपली पर्स चोरीस गेल्याचे ममता शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या महिलेसह मुलीचा शोध घेताला. मात्र, तोपर्यंत त्या दोघी फरार झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी कापड दुकान व व्यापारी संकुलनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. मात्र ती महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली नाही. चोरीस गेलेल्या पर्समध्ये एक तोळ्याचे नेकलेस, साडेचार तोळ्याचे गंठण, रोख एक हजार ३२० रुपये असल्याची तक्रार त्या महिलेने शहागड पोलिस चौकीत दिली आहे. दरम्यान, वाढलेल्या चो-या पाहता चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
ममता शिंदे ही महिला ज्या वाहनात बसून शहागड येथे आली. त्याच वाहनात गेवराई येथे बसलेली ती महिला व मुलगी शहागड येथे आली होती.
ममता शिंदे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघींनी तेथे जाऊन पर्सची चोरी केली. शिंदे यांच्यासोबत गेवराई येथून प्रवास करताना पाळत ठेवून ही चोरी केल्याचे बोलले जात आहे.