शांतीगिरी महाराजांकडून जालना शहरात ‘राजकारणाचे शुद्धीकरण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:11 AM2019-02-19T01:11:23+5:302019-02-19T01:11:48+5:30
वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकारण आणि राजकीय नेता कसा असावा यावर शांतीगिरी महाराजांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
जालना येथील जय बाबाजी परिवाराकडून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. यावेळी भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान केलेच पाहिजे, मतदान करताना पैशांच्या आमिषाला बळी न पडताते योग्य व्यक्तीला करून ते सत्पात्री लागले पाहिजे यासह राजकीय नेता कसा असावा, यावरही महाराजांनी मते मांडली. वंशपरंपरागत नेता असण्याऐवजी तो कर्तृत्ववान असला पाहिजे. पक्षाशी एकनिष्ठ हवा की, देशाशी एकनिष्ठ हवा असे अनेक प्रश्न श्रोत्यांना विचारून त्यांच्याकडूनही यावर उत्तरे जाणली.
यावेळी जालना येथील जय बाबाजी परिवाराचे प्रमुख दत्तात्रेय शिराळे, बालू चाटला, किशोर गरदास, कन्नी कटलू, सुरेश गुंटूक यांच्यासह वेरूळ येथील मठाचे सचिव रामनंद महाराज, काकासाहेब गोरेंची उपस्थिती होती. दरम्यान २००९ मध्ये शांतीगिरी महाराजांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामुळे ऐन लोकसभेपूर्वीच या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे चर्चेला उधाण आले आहे.