'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:37 PM2021-11-01T17:37:10+5:302021-11-01T17:37:40+5:30

Pundalikrao Danve: नव्वदीतही मुलगा चंद्रकांत दानवे यांच्यासाठी भोकरदन विधानसभा मतदारसंघात केला प्रचार. आज सकाळी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान झाले निधन.

'Sharad Pawar should give orders, I will fights Jalna Lok Sabha'; At the age of 92, Pundalikrao Danve had made a roar | 'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना

googlenewsNext

जालना : माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे आज सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यानची त्यांच्या बद्दलची एक आठवण सर्वांच्या कायम स्मरणात राहील अशी आहे. पुंडलिकराव दानवे ( Pundalikrao Danve) आपला मुलगा चंद्रकात दानवे ( Chandrakant Danave ) यांच्यासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होते. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे (NCP ) नेते शरद पवार ( Shrad Pawar ) यांनी जालना येथे जिल्ह्य़ातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी नव्वदी उलटलेले पुंडलिकराव व्यासपीठावर उपस्थित होते. भाषण संपल्यावर पवारांनी मुद्दाम पुंडलिकरावांना बोलावून स्वतः जवळ उभे केले आणि त्यांना उद्देशून ‘पुंडलिकराव आपण म्हातारे झालो आहोत का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर पुंडलिकरावांनीही ‘नाही-नाही’ असे सांगत प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले. तसेच माझं वय ९२ वर्ष असलं म्हणून काय झालं? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवेंविरोधात लढेन. ही गुरु-शिष्याची नाही तर राम रावणाची लढाई होईल.” अशी सणसणीत टीका ही प्रचारादरम्यान पुंडलिकराव दानवे यांनी केली होती.

पुंडलिक दानवे हे जालन्याचे माजी खासदार होते. १९७७ मध्ये जनता दलाकडून जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. नंतर भाजपकडून चार वेळा लोकसभा लढले. त्यात ते एकदाच जिंकले. अगदी १९९० पर्यंत जालना जिल्हा म्हणजे पुंडलिकराव दानवे, असे समीकरण होते. पुढे जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीचा उदय झाला. १९८५ साली रावसाहेब दानवे हजार-दीड हजार मतांनी पराभूत झाले. मात्र, जालन्याच्या राजकारणात त्यांनी आपला जम बसवला. पुढे १९९० मध्ये रावसाहेब दानवे विधानसभेवर निवडून गेले आणि भाजपमध्ये पुंडलिकराव दानवे मागे पडत गेले. पुढे पाचव्या वेळी जालन्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणाऱ्या पुंडलिकरावांना भाजपने तिकीट नाकारलं तेव्हापासून रावसाहेब दानवे आणि पुंडलिकरावांमधील अंतर वाढत गेलं.

दानवे विरुद्ध दानवे संघर्षाचा आखाडा
भोकरदन विधासभा क्षेत्रात २००३ साली रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाला पहिला धक्का बसला. २००३ साली त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले आणि निवडून आले. खरंतर ही लढत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दानवे यांचे वडील माजी खासदार पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेंव्हापासूनच दोन्ही दानवे राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. चंद्रकांत दानवे यांनी पुढे १२ वर्ष भोकरदन मतदारसंघात आपले वर्चस्व गाजवले. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ यादोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजप खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या दोन्ही लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.

Web Title: 'Sharad Pawar should give orders, I will fights Jalna Lok Sabha'; At the age of 92, Pundalikrao Danve had made a roar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.