Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:51 AM2024-09-25T09:51:33+5:302024-09-25T09:55:07+5:30
Rajesh Tope meets Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतली.
Manoj Jarange Rajesh Tope : मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून अन्न-पाण्याचा त्याग करत उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, मंगळवारी (२४ सप्टेंबर) मध्यरात्री आमदार राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली. राजेश टोपे अंतरवाली सराटीमध्ये गेले. त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीची चौकशी केली.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर नेत्यांच्या अंतरवाली सराटीतील चकरा वाढल्या असून, मंगळवारी मध्यरात्री आमदार राजेश टोपे यांनी जरांगेंची भेट घेतली.
राजेश टोपे मनोज जरांगेंमध्ये चर्चा
मध्यरात्री राजेश टोपे अंतरवाली सराटीत ज्या ठिकाणी जरांगे उपोषण करत आहेत, त्याठिकाणी मध्यरात्री १२ वाजता आले होते. जरांगे यांच्या उशाला ते बसले. जरांगे यांच्यासोबत त्यांची चर्चाही झाली. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याबद्दल कळू शकले नाही.
मात्र, राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत प्रकृतीबद्दल चौकशी केली.
मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली
सोमवारपासूनच मनोज जरांगेंची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती आणखी खराब झाली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मध्यरात्रीनंतर मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आल्याची माहिती आहे.
१७ सप्टेंबरपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांचा उपोषणाचा नववा दिवस आहे. यापूर्वी त्यांची संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली होती. तर उपोषणाला बसण्यापूर्वी खासदार संदीपान भुमरे भेटून गेले होते.