शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत
By विजय मुंडे | Published: June 7, 2023 12:14 PM2023-06-07T12:14:03+5:302023-06-07T12:22:41+5:30
बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांना बळ देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट जाफराबादेत
जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत जाफराबादच्या नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने यांनी त्यांच्यावर झालेल्या राजकीय आरोपांचा पाढा वाचत अश्रुंना वाट मोकळी केली होती. त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार थेट जाफराबादेत दाखल झाल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
जाफराबादच्या नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने यांच्यावर काही दिवसांपूर्वी विविध आरोप करीत अविश्वास ठराव दाखल झाला होता. यावरून चांगलेच रणकंद माजले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या अनुषंगाने बैठक झाली होती. या बैठकीत सुरेखा लहाने या जाफराबादेत घडलेल्या प्रकार सांगताना भावूक झाल्या होत्या. कार्यकर्ती भावूक झाल्याचे पाहताच दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी खा. पवार यांनी जाफराबाद शहर गाठून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आ.राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, माजी खा. जयसिंग गायकवाड, माजी आ.संजय वाघाचौरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष निसार देशमुख व इतरांची उपस्थिती होती.
चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळते
जाफराबादेत जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु, विरोधकांकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरूपयोग येथे सुरू असल्याचे दिसते. नगराध्यक्षा डॉ.सुरेखा लहाने उत्तम काम करत असताना नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. आम्ही अनेक वर्ष सत्तेत होतो. मात्र सत्ता आम्ही अंगात येऊ दिली नाही. सत्ता येते जाते. मात्र चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळते. याचा विचार करून कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे, असा सल्ला खा. पवार यांनी यावेळी दिला.
राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही
नगरपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना कितीही दबाव आला तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार आहे. राज्यातील सत्तधारी पक्षाने नगरसेवकांना हाताशी धरून सुरू केलेल्या राजकारणाला आपण घाबरणार नाही, असे नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी यावेळी सांगितले.