शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:49 PM2023-09-02T16:49:52+5:302023-09-02T16:50:46+5:30
या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे.- शरद पवार
अंतरवली सराटी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दुपारी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची अंबड येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अंतरवली सराटी गावात जाऊन उपोषणस्थळी गेले. येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह जखमींची विचारपूस केली.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु असताना शुक्रवारी सायंकाळी पोलीस आणि आंदोलकांत वाद झाले. यातून पोलिसांनी बळाचा वापर करत आश्रुधुरचे नळकांडे फोडले, आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांनी देखील दगडफेक केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक मोठ्याप्रमाणावर जखमी झाले आहेत. सरकार पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडीत काढत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर पहावयास दिसत आहेत. सर्वत्र पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध करण्यात येत आहे. यातच आज सकाळपासून विविध पक्षांची नेते, सानाजिक संघटना, तसेच मराठा बांधव उपोषणस्थळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पोहचत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर मार्गे जालन्याकडे सकाळी रवाना झाले. प्रथम त्यांनी अंबड येथे रुग्णालयात दाखल होते जखमी आंदोलकांची चौकशी केली. त्यानंतर अंतरवली सराटी गावात उपोषणस्थळी जात मनोज जरांगी आणि इतर जखमींची भेट घेतली. आंदोलकांशी पवार यांनी यावेळी चर्चा केली. शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर केला ही दुर्दैवी घटना आहे. या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच सर्वांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.