शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:58 PM2022-04-19T16:58:36+5:302022-04-19T17:01:27+5:30

शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती.

Sharad Pawar's visit to Jalna; Rajesh Tope's struggle to pull back Shiv Sena's Dr. Hikmat Udhan | शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

googlenewsNext

जालना : जिल्ह्यातील शिल्लक उसाचा मुद्दा गंभीर बनला आहे, हे खरे आहे. तो जास्तीत जास्त प्रमाणात गाळप व्हावा यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलेले प्रयत्नदेखील शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सर्वसामान्यांना दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढीसह २५० कोटींच्या नवीन साखर कारखान्याची घोषणा ही दिलासादायक वाटू शकते. आणि तशी आहे देखील. परंतु पडद्याआड झाकून पाहिले असता, एकप्रकारे टोपे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेते डॉ. हिकमत उढाण यांना यातून इशारा देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पायाभरणीचा श्रीगणेशा केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जालना जिल्ह्यात दिवंगत सहकार महर्षी माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेवून, दोन सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूत गिरणी, काळाची गरज लक्षात घेत जालन्यात अभियांत्रिकी महाविद्याल तसेच बँक उभारून मोठी क्रांतीच केली. शिस्तबध्द पध्दतीने या संस्थांची वाटचाल ही देखील महत्वाची बाब होती. तोच वारसा अंकुशराव टोपे यांचे पुत्र आणि सलग पाचवेळेस आमदार, मंत्री राहिलेले राजेश टोपे हे देखील खंबीरपणे चालवित आहेत. काळाची गरज ओळखून राजेश टोपे हे निर्णय घेतात. सध्या जालना जिल्ह्यात १६ लाख टन ऊस अतिरिक्त बनला आहे. तो गाळपासाठी दररोज साडेसात हजार गाळप करणारा तिसरा कारखाना निर्मितीची घोषणा त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केली. आणि त्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासनही पवारांसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी जाहीरपणे दिली. यात टोपेंचा प्रांजळपणा आणि शेतकऱ्यांप्रति असलेली त्यांची निष्ठा जरी दिसत असली तरी त्याला राजकीय किनारही आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे तो उढाण यांचा कारखानाही उसाशी संदर्भातील असून, या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. आणि आपोआप उढाणांना शेतकरी त्यातून जेाडता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन टोपे यांनी नवीन कारखान्याची घोषणा केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टोपेंचा विरोधकांना धोबी पछाड...
आज घडीला राजेश टोपे यांना राष्ट्रवादीतून आव्हान देणारे दुसरे नेतृत्व नाही. सलग पाचवेळेस त्यांनी आमदार म्हणून केलेले कार्य तसेच त्यांच्या वडिलांनी संस्थात्मक पध्दतीने बांधून ठेवलेली जनशक्ती ही टोपेंची बलस्थाने आहेत. त्यांना सध्या तरी पक्षासह अन्य पक्षातूनही टक्कर देणारा नेता नाही. या आधी दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांना माजी आमदार ॲड. विलास खरात यांनी चांगलीच टक्कर दिली होती. खरात यांनी अंकुशराव टोपेंप्रमाणेच शैक्षणिक संस्था, सहकारी सूत गिरणी, बँकांच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केलेले आहे. परंतु खरात हे सध्या भाजपमध्ये असून, घनसावंगी मतदार संघ हा युतीत शिवसेनेला सुटला होता. परंतु आता युती नसल्याने खरातांच्या भूमिकेलाही महत्त्व येणार आहे. डॉ. हिकमत उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीत टोपेंना अक्षरश: झुंजवले होते. हे टोपे सहजासहजी विसणार नसून, त्या दृष्टीनेच त्यांनी तिसऱ्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून उढाणांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Web Title: Sharad Pawar's visit to Jalna; Rajesh Tope's struggle to pull back Shiv Sena's Dr. Hikmat Udhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.