साखर वाटून साजरा केला मुलगा सापडल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:02 AM2017-11-18T00:02:34+5:302017-11-18T00:03:06+5:30
परतूर : अभ्यासाचा कंटाळा आल्याने घरातून दहा महिन्यांपूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवारी आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ...
परतूर : अभ्यासाचा कंटाळा आल्याने घरातून दहा महिन्यांपूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवारी आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तो अहमदनगर येथे एका शेतक-याच्या शेतात काम करीत होता. दरम्यान, मुलगा परत आल्याच्या आनंदात आकाशच्या आई-वडिलांना गावात एक क्विंटल साखर वाटली.
परतूर तालुक्यातील रोहिणा खु. येथील आकाश शिवाजी तांगडे हा शहरातील एका शाळेत दहावीत शिकत होता. शिक्षणाचा कंटाळा आल्याने तो अचानक रेल्वेने औरंगाबाद व तेथून पुढे अहमदनगर येथे गेला. येथे उत्तम मुरलीधर हराळ या शेतकºयाची व आकाश याची ओळख झाली. हराळ यांनी त्यास केवळ जेवणाच्या मोबदल्यावर कामाला ठेवले.
परतूर ठाण्यात वडील शिवाजी तांगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने पोलीस आकाशचा शोध घेत होते. गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस कॉन्स्टेबल शाम गायके हे नगर येथे गेले. स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलीस थेट हराळ यांच्या शेतात पोहोचले. आकाशला ताब्यात घेऊन गुरुवारी रात्री परतूर येथे आणले.
शुक्रवारी सकाळी त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शिक्षणाचा कंटाळा आल्याने आपण घरातून निघून गेलो होतो, असे आकाशने सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक आर. टी. रेंगे उपनिरीक्षक विजय जाधव, शाम गायके यांनी आकाशच्या शोध मोहिमेत सहभाग घेतला.