घरकुल अनुदानासाठी संघर्ष तीव्र करणार : शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:09 AM2019-08-19T01:09:27+5:302019-08-19T01:10:16+5:30
बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : स्वत: च्या रक्ताचं पाणी करून जगासाठी सावली तयार करणाऱ्या बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले.
सिटू प्रणित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने रविवारी कुंभार पिंपळगाव येथे घरकुल हक्क परिषद घेण्यात आली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसचिव अण्णा सावंत, राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे, राज्य कोषाध्यक्ष अब्राहम कुमार, जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, लाला बावटाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, प्रारंभी अंबड पाथरी टी पॉइंट ते मंगल कार्यालय अशी भव्य कामगार रॅली काढण्यात आली.
कामगाराच्या घरकुलासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख, केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख तर राज्य सरकारकडून पन्नस हजार असे घरकुल अनुदान म्हणून बांधकाम कामगाराचे घर बांधण्यासाठी अनुदान म्हणून पाच लाख रुपये देण्याची महत्वाची मागणी घरकुल हक्क परिषदेतून करण्यात आली. तर यासाठी राज्य स्तरावर आंदोलनही करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आपल्या भाषणातून शेख यांनी दिला. तर जालन्यातील एका मोठ्या मंत्र्याच्या पी ए ने कामगारांच्या लाभासाठी कामगार म्हणून नोंदणी केली आहे.
बोगस लाभार्थ्यांबाबत सिटू शांत बसणार नाही, असे ही शेख यांनी यावेळी सांगितले. बांधकाम कामगारांसह सर्वच क्षेत्रातील कामगारांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन अण्णा सावंत यांनी आपल्या भाषणातून केले.
उपस्थितांनी सत्ताधारी, विरोधकांवर सडकून टीका करीत विधानसभा निवडणुकीत कामगार संघटनेकडून घनसावंगी मतदार संघातून गोविंद आर्द्रड निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील सहायक कामगार अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे कामगारांना माहितीसह योजनांची अंमलबजावणी, फायदा मिळण्यास उशीर होत आहे.
कामगार नोंदणीबाबत ही वेळ लागत आहे. त्यामुळे सहायक कामगार अधिकारी पद भरण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासाठी वेळप्रसंगी आंदोलन ही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध प्रकारच्या योजना आहेत. तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून सेफ्टी किटचे ही वितरण केले जात आहे. यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करून विविध योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन परिषदेत करण्यात आले.