परतूर बाजार समिती निवडणुकीत 'शिंदेसेना' बॅकफूटवर; एकही उमेदवार मिळाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:42 PM2023-04-24T19:42:45+5:302023-04-24T19:44:04+5:30
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही.
- शेषराव वायाळ
परतूर : तालुक्यात आष्टी व परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही. तर दुसरीकडे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला एकही उमेदवार मिळाला नाही.
परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपापसांत जागावाटप केल्याने निवडणुकीतील हवा काढून टाकली. तर आष्टी बाजार समितीच्या निवडणुकीत युतीच्या वाटाघाटी फिस्कटल्याने भाजपा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांत लढत होत आहे. आष्टी बाजार समितीत १८ पैकी १ जागा बिनविरोध निवडली गेली आहे. १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर परतूर बाजार समितीत १८ पैकी ६ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. १२ जागांसाठी येथेही निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट असा सामना होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला या निवडणुकीत उमेदवार मिळालेले नाही. परतूर शहरात व इतरत्र कोट्यवधींचा विकास निधी आणून आपण मोठा विकास केल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगत असले, तरी या गटाला निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नसल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. परतूर बाजार समिती निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपसात वाटाघाटी करून जागा वाटून घेतल्या. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे. मात्र, आष्टी बाजार समिती निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख पुढाऱ्यांनी आपला प्रचाराचा ताफा आष्टी बाजार समितीकडे वळविला आहे.
भाजपा-शिंदे गटात वितुष्ट
परतूर बाजार समिती निवडणुकीत शिंदे सेनेचा एक उमेदवार अपक्ष निवडणूकही लढवीत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेच्या शिंदे गटात वितुष्ट आल्याची चर्चा आहे. भाजपानेही शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार आयात करून त्याला आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपने आमचा विश्वासघात केला
भाजप आणि आमच्या पक्षात युती होणार असल्याचे सांगून भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस व काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपने आमचा विश्वासघात केला आहे. परतूर बाजार समितीत आमच्या पक्षाचा एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
- मोहन अग्रवाल, जिल्हाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट)