शिवसेनेने समाजसेवेला नेहमीच प्राधान्य दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:46+5:302021-07-01T04:21:46+5:30
जालना : शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करत असतानाच समाजसेवेलाही ८० टक्के महत्त्व दिले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हा ...
जालना : शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करत असतानाच समाजसेवेलाही ८० टक्के महत्त्व दिले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हा उद्देश असून, तो आम्ही सर्व जण मिळून पुढे नेत असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
बुधवारी सामंत हे जालना दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्र. १३ मधील नवीन सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी चाेथे, बाबासाहेब इंगळे, जि.प.चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील विविध कामांसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. नगरसेवक विजय पवार यांनी सामंत, खोतकर यांचा सत्कार केला. या वेळी सागर चौधरी, विनोद पवार, विनोद बोडले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर नाईकवाडे यांनी केले. कार्यक्रमास ॲड. बी.एम. साळवे, शेख दादामिया, अक्तरभाई, भाऊसाहेब घुगे, मंगल मिटकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले, डॉ. पूजा वावगे, राजेश काजळकर, महेश काजळकर, ज्योती आडेकर, अभिषेक कासारे, सिद्धार्थ वारे, कौसाबाई डोईवाड, महेश खरात, मधुकर खरात आदींची उपस्थिती होती.
लसीकरणाचे कौतुक
भाग्यनगरमधील अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू आहे. या केंद्रात ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे त्याचे कौतुक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. या केंद्रातील नियोजनाचा आदर्श राज्यपातळीवर घेतला जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी तळागळापर्यंत सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचा आग्रह धरला. आपले विरोधक कुठल्याही विकासकामांवर टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता सरकार करीत असलेली कामे जनतेपर्यंत न्यावी, असेही सामंत म्हणाले. या वेळी खोतकर यांनीही मत मांडले.