दानवेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:35 AM2018-06-28T01:35:13+5:302018-06-28T01:35:34+5:30
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा विभागीय मेळाव्याचे आयोजन करून शिवसेना एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा विभागीय मेळाव्याचे आयोजन करून शिवसेना एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात जाहीर केलेल्या आठवडाही उलटला नाही, तोच जालन्यात संपूर्ण मराठवाड्यातील निवडक ४०० शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आणि मेळाव्याचे आयोजन गुरूवारी येथील बीज शीतल सीडस्च्या सभागृहात सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
सध्या एकूणच भाजप आणि शिवसेनेतील मैत्रीपूर्ण संबंध ताणले गेले आहेत. युती होणार की, नाही या संभ्रमात कार्यकर्ते आहेत.
ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी युतीचे पाहू परंतू सध्या तर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष मोर्चेबांधणीत मग्न आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राजूर येथे भाजपची बैठक तर शिवसेनेच्या मेळाव्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मेळाव्याचे निमित्त
सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात माध्यमांमधून जे वाक्युध्द पेटले आहे, ते संपूर्ण राज्याने अनुभवले. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्यात (जो की, जुना शिवसेनेचा होता) हा मेळावा थेट मोतोश्री वरून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी गेल्या दोन वर्षात खा.दानवे यांनी स्वत: जालन्यात लक्ष घालून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली आहे. जी की पूर्वी शिवसेनेची होती. या मेळाव्यात नेमके काय निर्णय होतात आणि शिवसैनिकांना कोणते आदेश मिळतात, याकडे लक्ष लागून आहे.
खोतकर परदेशात
राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे परदेशात असताना एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या मेळाव्याचे नियोजन कसे करण्यात आले याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र , राज्यमंत्री खोतकर हे परदेशात गेल्यानंतर या मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. खोतकर हे सध्या अमेरिकेच्या खाजगी दौ-यावर आहेत.