सेनेच्या वाघाचा बनला कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:26 AM2018-01-25T00:26:04+5:302018-01-25T00:26:16+5:30
शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जाफराबाद/घनसावंगी : शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जाफराबाद व घनसावंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुपारी हल्लाबोल मोर्चास सुरुवात झाली. या वेळी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खा. माजिद मेमन, जयंत पाटील, आ. राजेश टोपे, माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेंद्र शिंगणे, माजी खा. कुंडलिक दानवे, कदीर मौलाना, विजय साळवे, डॉ. निसार देशमुख, महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, रंगनाथ काळे, सुधाकर दानवे, राजेश चव्हाण, लक्ष्मण ठोंबरे, केशव जंजाळ, दीपक पाटील, सऊद शेख यांची उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील हे सरकार शेतकरी हिताचे नाही. या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील १ कोटी ३० लाख शेतक-यांपैकी फक्त ८९ लाख शेतक-यांचे कर्ज माफी झाल्याची फसवी घोषणा शासन करीत आहे. आजपर्यंत शेतक-यांच्या खात्यात काहीच रक्कम जमा झाली नाही. किती कर्ज माफी झाले याची माहिती सरकार जाहीर करत नाही. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे शेतकºयांच्या कमरेखाली गोळ्या घालण्याची भाषा करतात. न्यायाधीशांना सुद्धा जनतेसमोर यावे लागत आहे. विकासाची भाषा करणारे उलट वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत, अशी चौफेर टीका पवार यांनी केली.
आ. टोपे म्हणाले की, भाजप नेते खोटे बोलण्यात पटाईत आहेत. राज्यात जातीय राजकारण केले जात आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत.
माजी आ. दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील शेतकºयांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून लिफ्ट इरिगिशनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, ऊस गाळपाचा प्रश्न सोडावा, असे सांगून सरकारवर टीका केली. या वेळी तहसीलदार जे. डी. वळवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, कौसर शेख, संतुकराव उबाळे, रामधन कळंबे, कपिल आकात, दत्तू पंडित, वामन दांडगे, कैलास दिवटे, मुजीब शेख, बंटी औटी, नंदकुमार गि-हे, मनीषा जंजाळ, सुनीता सावंत, नईम कादरी, रविराज जैस्वाल, शेख बाबू, राजेश म्हस्के, गजू लोखंडे, फैसल चाऊस यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घनसावंगी येथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आयजीच्या जिवावर बायजी..
बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना निकृष्ट बियाणे देणा-या कंपन्यांकडून पैसे घेऊन सरकार शेतक-यांना मदत देणार आहे. वा रे सरकार, आयजीच्या जिवावर बायजी उदार, असा हा प्रकार असल्याची खोचक टीका पवार यांनी केली. राज्यातील शेतक-यांवर जेव्हा संकटे आली, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. परंतु आताच्या सरकारने आश्वासनांपलीकडे काहीच दिले नसल्याचे ते म्हणाले.
-------------------
...तर हिंमत झाली असती का?
घनसावंगी : ‘कमळाबाई’ शिवसेनेचे आमदार फोडण्याची घोषणा करत आहेत. यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये आले कोठून, बाळासाहेब असते तर हिमंत झाली असती का, असा सवाल अजित पवार यांनी घनसावंगी येथे बोलताना उपस्थित केला. पैशाच्या जोरावर भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे ते म्हणाले.
------------
पायाखालची वाळू सरकली-मुंडे
मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली.