जिल्ह्यात निवडणुकीसाठी शिवसेनेची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:11 AM2018-02-23T00:11:47+5:302018-02-23T00:11:51+5:30
स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांना विविध विधानसभा मतदार संघांत पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या दौ-याचा अहवाल नेत्यांना २८ फेब्रुवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करावा लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने या जिल्ह्यासह राज्यातील विधानसभा मतदार संघांत याची चाचपणी सुरु केली आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांना पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्या-त्या जिल्ह्यातील मतदार संघात ३९ मुद्यांवर पक्षनिरीक्षक काम करीत आहेत. पक्षस्थिती, गावे, शाखांबाबत माहिती, लोकांचे मत, शिवसेनेने शेतक-यांसाठी केलेली विविध आंदोलने, जनमत संघटीत होऊ शकेल अशी तीन ज्वलंत प्रश्न पाहायचे, बुथ प्रमुखांच्या निवडी आदी मुद्यांचा पक्षनिरीक्षक अभ्यास करीत आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे याचीही चाचपणी विविध विधानसभा मतदार संघांत नेत्यांकडून केली जात
आहे.
२१ ते २३ फेब्रुवारी या काळात जबाबदारी दिलेल्या मतदार संघात चाचपणी केली जात आहे. या चाचपणीचा परिपूर्ण निरीक्षण अहवाल पक्षनिरीक्षक २८ फेब्रुवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.
जालना जिल्ह्यात गणेश लटके यांना जालना, भोकरदन आणि बदनापूर या विधानसभा मतदार संघात पक्षनिरीक्षक म्हणून नेमले आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्याकडे परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही नेते जालना जिल्ह्याच्या दौ-यावर असून, पक्षाची सद्यस्थिती जाणून घेत लोकांच्या भेटी आणि राजकीय वातावरण याबाबत निरीक्षण हे नेते करीत आहेत.
जिल्ह्यातील शिवसेनेची परिस्थिती आणि लोकांचे मत याचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास केला जाणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
अंबेकर, बोराडे, चोथेंकडे हे मतदार संघ..
संपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांच्याकडे नेवासा, श्रीरामपूर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याकडे संगमनेर, शिर्डी आणि अकोले, तर ए.जे.बोराडे यांच्याकडे सोलापूर (पूर्व), बार्शी आणि मोहोळ या विधानसभा मतदार संघांची पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.