धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:23 PM2022-04-08T14:23:51+5:302022-04-08T14:25:01+5:30
वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.
जालना : अनैतिक संबंध, मालमत्ता, कौटुंबिक कलह, शेती, आर्थिक व्यवहार अशा विविध प्रकारांतील वाद विकोपाला गेल्यामुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात तब्बल ८ खून झाले आहेत. त्यापैकी सर्व खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही खुनांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. एकाच महिन्यांत आठ खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. जालना पोलीस दलाकडून गुन्हे नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाया केल्या जात आहेत.
मार्च महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच पाहायला मिळाली. एकापाठोपाठ तब्बल सात खून १५ दिवसांत झालेत. त्यानंतर एक खून झाला आहे. एक महिला व सात पुरुषांचे खून झाले आहेत.
तीन महिन्यांत १६ खून
गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात १६ खून झाले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत केवळ ८ खून झाले होते, तर एकट्या मार्च महिन्यात ८ खून झाले आहेत.
अशा घडल्या खुनाच्या घटना
१) वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून जालना तालुक्यातील मोहाडी छबू घासू राठोड (५३) यांचा पुतण्यानेच खून केला होता.
२) भांडणातून मित्रानेच भगवान राजू तळेकर (२३) या चालकाचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी पाटीजवळ घडली होती.
३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे घडली होती.
४) अंबड शहरातील रामेश्वर अंकुश खरात (२०) या तरूणाचा खून करण्यात आला.
५) जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बैल चोरीच्या संशयावरून शेजाऱ्यानेच सोमीनाथ श्यामराव जाधव ( ४३) यांचा खून केला होता.
६) शेजारी राहणाऱ्या महिलेने साथीदारासह जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील महिला सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा खून केला होता.
७) जालना तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी राजकुमार भास्कर साळवे (३२) यांचा खून करण्यात आला होता.
८) आर्थिक देवाण-घेवाणीवरून फुलंब्री येथील राजेश मुरलीधर जाधव (४२) यांचा खून करून मृतदेह परतूर तालुक्यातील मांडवा परिसरात आणून टाकला होता. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे.