प्रेमविवाहाचा दुखद अंत! सासू-सासऱ्याने सुनेचे पाय धरले अन् नवऱ्याने तोंडात विष ओतून संपवले
By दिपक ढोले | Published: August 12, 2022 03:57 PM2022-08-12T15:57:26+5:302022-08-12T15:58:50+5:30
दोघांनी प्रेमविवाह केला होता, मात्र यामुळे लग्नात काही मिळाले नसल्याच्या कारणावरून सासू-सासरे आणि पतीही विवाहितेचा छळ करत
जामखेड (जालना) : लग्नात हुंडा न मिळाल्याने सासू-सासरा- भाया, जाऊ यांनी २६ वर्षीय विवाहित महिलेचे हातपाय धरले. नवऱ्याने तोंडात विषारी द्रव ओतून ठार मारल्याची घटना अंबड तालुक्यातील बक्ष्याचीवाडी येथे शुक्रवारी उघडकीस आली. रंजना ऊर्फ पूजा सचिन राठोड (२६ रा. बक्ष्याचीवाडी, ता. अंबड) असे मयत महिलेचे नाव आहे.
चार वर्षांपूर्वी पूजा यांचा विवाह घराच्या पाठीमागे राहणाऱ्या सचिन जाणू राठोड याच्याशी झाला होता. हे लग्न पूजा व सचिनच्या इच्छेने झाले होते. याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे घरचे लोक पूजा व तिच्या सासरच्या मंडळींना बोलत नव्हते. सुरुवातीला काही दिवस त्यांचा संसार चांगला चालला. नंतर मात्र वादावादी सुरू झाली. तुझ्यामुळे आम्हाला लग्नामध्ये पैसे व वस्तू मिळाल्या नसल्याने आमचे नुकसान झाले आहे, असे म्हणून सासरचे मंडळी पूजाला नेहमी मारहाण करीत होते. १० ऑगस्ट २०२२ रोजी संशयित पूजाचा नवरा सचिन जाणू राठोड, सासरा जाणू साहू राठोड, सासू, भाया गोरख जाणू राठोड, जाऊ यांनी पूजाला मारहाण केली. त्याचवेळी घरातील सर्व मंडळींनी तिचे हातपाय पकडले व नवरा सचिनने तिच्या तोंडात विषारी द्रव ओतले.
पूजाचा भाऊ व गावातील लोक सोडविण्यासाठी आले असता, त्यांना बाजूला ढकलून देण्यात आले. नातेवाईक व गावातील लोकांनी पुजाला पाचोड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथम उपचार करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मयताचा भाऊ राहुल जाधव याच्या फिर्यादीवरून संशयित पूजाचा नवरा सचिन जाणू राठोड, सासरा जाणू साहू राठोड, सासू, भाया गोरख जाणू राठोड, जाऊ यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी फरार
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, अशोक म्हस्के, शेख हैदर यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि. नरके हे करीत आहेत.