जावयाचा हायटेन्शन विद्युत खांबावर शोलेस्टाईल राडा; नातेवाईकांसह प्रशासनाला 'शॉक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 08:06 PM2021-07-30T20:06:16+5:302021-07-30T20:09:08+5:30
दारूच्या नशेत सोनखेडा- भराडखेडा शिवारातील विद्युत प्रवाह सुरू असलेल्या हायटेन्शन खांबावर तो चढला.
जाफराबाद (जि.जालना) : एका जावयाने दारूच्या नशेत सासरवाडीच्या शिवारात असलेल्या महावितरणच्या विद्युत प्रवाह सुरू असलेल्या हायटेन्शन विजेच्या खांबावर चढून तीन तास शोलेस्टाईल राडा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सोनखेडा- भराडखेडा (ता. जाफराबाद) शिवारात घडली. कौटुंबिक वादातून सार्वजनिक ठिकाणी शोलेस्टाईल राडा करणाऱ्या जावयाला खांबावरून खाली उतरविण्यासाठी प्रशासनाला तीन तास कसरत करावी लागली. ( son-in-law on the high-tension electric pole; 'Shock' to administration with relatives )
मंगेश देवीदास शेळके (३२ रा. कोळेगाव ता. जाफराबाद) असे त्या युवकाचे नाव आहे. कोळेगाव येथील मंगेश शेळके याची सोनखेड हे गाव सासरवाडी आहे. त्याची पत्नी कौटुंबिक वादामुळे माहेरी आली होती. याच कौटुंबिक वादातून गुरूवारी सायंकाळी मंगेश शेळके याने सासरवाडी असलेले सोनखेड गाव गाठले. दारूच्या नशेत सोनखेडा- भराडखेडा शिवारातील विद्युत प्रवाह सुरू असलेल्या हायटेन्शन खांबावर तो चढला. घटनेची माहिती मिळताच सासरवाडीतील मंडळींनाही शॉक लागला. पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. ग्रामस्थांनी समजूत काढूनही मंगेश शेळके हा विद्युत खांबावरून खाली उतरत नव्हता. विद्युत प्रवाह सुरू असल्याने घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेले तहसीलदार सतीश सोनी, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये व ग्रामस्थांनी तीन तास अथक प्रयत्नातून मंगेशची समजूत काढली. त्यानंतर तो विद्युत खांबावरून खाली उतरला. विद्युत प्रवाह सुरू असलेल्या खांबावरून तो सुखरूप खाली उतरल्याने सासरवाडीतील मंडळींच्या जिवात जीव आला.
हर्सुल कारागृहात रवानगी
सोनखेडा- भराडखेडा शिवारातील महावितरणच्या विद्युत खांबावर चढलेल्या मंगेश शेळके विरुध्द जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची औरंगाबादेतील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.