पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी ‘शोले स्टाईल वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:55 AM2018-04-16T00:55:03+5:302018-04-16T00:55:03+5:30

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर गावात रविवारी महिलांनी पाणी मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल वीरुगिरी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

'Shole Style Veeragiri' agitation for drinking water | पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी ‘शोले स्टाईल वीरूगिरी’

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी ‘शोले स्टाईल वीरूगिरी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर गावात रविवारी महिलांनी पाणी मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल वीरुगिरी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.
परतूर शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून शहरासाठी शुध्द पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, शहराच्या अनेक भागात अद्याप शुद्ध पाणी पोहचलेले नाही. तर काही भागात पाच ते दहा मिनिटेच पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी गैरसोय होते.
शहरातील राजपूत गल्लीतील महिलांनी नगरपालिकेत अनेकदा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिली आहेत. परंतु वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने काही महिलांनी रविवारी दुपारी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक कृष्णा अरगडे यांनी मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांना कळविले. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. या वेळी आंदोलनकर्त्या महिला व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांमध्ये काही वेळ जुंपली. मुख्याधिकारी ईरलोड यांनी मध्यस्थी करत या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले. त्यानंतर महिला पाण्याच्या टाकीवरून खाली उतरल्या. आंदोलनात सरस्वती काळे, सविता रासे, रामप्यारी ताटू, कुशीवर्ता फटींग, नंदाबाई रासे, कासाबाई चव्हाण, मालती बाई महेर, राधाबाई ताटू, नंदाबाई दिरंगे, लक्ष्मी काळे, पूजा काळे, रूख्मिणी रासे, लक्ष्मीबाई भुजा, नीता महेर, कावेरी रासे, लताबाई रासे आदी महिलांनी सहभाग घेतला.

Web Title: 'Shole Style Veeragiri' agitation for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.