शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:38 PM2022-03-04T12:38:24+5:302022-03-04T12:41:35+5:30
भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते.
जालना : भाटेपुरी येथील शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्यामुळे दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना जालना तालुक्यातील रामनगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पोटात गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विलास मोरे यांनी दिली. याप्रकरणी परस्परविरोधी तब्बल ६१ जणांवर रात्री उशिरा मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. यातूनच शिवाजी शेजूळ व रमेश यज्ञेकर यांच्यात बुधवारी सायंकाळी वादावादी झाली. त्यानंतर रमेश यज्ञेकर यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. एकमेकांवर दगडफेकदेखील करण्यात आली. रमेश यज्ञेकर यांनी स्वत:जवळची रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार गेला. विजय ठेंगळे यांच्या पोटाला गोळी लागली. पोलिसांनी त्यांना तात्काळ जालना येथे उपचारासाठी पाठविले. ठेंगळे यांना तपासून औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले.
दरम्यान, दोन्ही गटांनी पोलिसांवरही दगडफेक केली असून, यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू माेरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विलास मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जमावाला शांत केले, अशी माहिती सपोनि विलास मोरे यांनी दिली.
२० जणांना केली अटक
घटना घडल्यानंतर पोलिसांनी जवळपास २० जणांना अटक केली आहे. एका गटातील ११ तर दुसऱ्यातील ९ जणांचा यात समावेश आहे. यापूर्वीही या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली होती.
पाच गोळ्यांच्या फैरी झाडल्या
या वादातून झालेल्या गोळीबारात रमेश यज्ञेकर यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून पाच गोळ्यांच्या फैरी झाडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वादामुळे गुरुवारी रामनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. भांडण झालेल्या परिसरात पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, पोलिसांसमोर हा गोळीबार झाला. त्यात नंतर पोलिसांनी ती रिव्हॉल्व्हर जप्त केली.
गोळीबार प्रकरणी ६१ जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी रात्री उशिरा परस्परविरोधी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. रमेश यज्ञेकर यांच्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी शेजुळ, मुरलीधर शेजुळ, उत्तम शेजुळ, श्रीराम शेजुळ, राम शेजुळ, पांडुरंग शेजुळ, तुकाराम शेजुळ, कृष्णा शेजुळ, शाम शेजुळ, अशिष शेजुळ, मनोज शेजूळ, कृष्णा शेजुळ, अर्जुन शेजुळ, नारायण शेजुळ, प्रभाकर शेजुळ यांच्यासह ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर शिवाजी शेजुळ यांच्या फिर्यादीवरून संशयित रमेश यज्ञेकर, गजानन यज्ञेकर, श्रीराम यज्ञेकर, मनोहर यज्ञेकर, मनोहर पोटे, कृष्णा झुंगे, गेंदालाल झुंगे, अरूण यज्ञेकर, अशोक झुंगे, गोविंद झुंगे, अरूण गुऱ्हाळकर, अनिल जोशी, राजाराम झुंगे, मच्छिंद्र पवार यांच्यासह २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.