शहरातील लसीकरण केद्रांवर नागरिकांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:59+5:302021-06-16T04:39:59+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मागील दोन महिन्यांत झपाट्याने वाढला होता. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मागील दोन महिन्यांत झपाट्याने वाढला होता. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. शिवाय, लसीकरणावर ही भर देण्यात आला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी सुरूवातीला लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे आतापर्यंत शहरातील चार युपीएससी केंद्रांवर आतापर्यंत २८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहेत. या पैकी १० हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सध्या लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी झाली आहे. सोमवारी कोविशिल्डचे ४५०० तर कोव्हॅक्सिनचे २ हजार डोस प्राप्त झाले आहेत. शहरी केंद्रांवर दिवसभरातून ४० ते ४५ लोकांचेच लसीकरण केले जात आहे. पूर्वी याच केंद्रांवर रोज ३०० ते ४०० जणांचे लसीकरण करूनही रांगा संपत नव्हत्या. विशेष म्हणजे, आता ऑफलाइन नोंदणी करूनही लसीकरण करायला कोणी तयार नाही. अपॉईंटमेंट घेऊन लसीकरणाला जाणाऱ्यांचा ओघ तर आता उरलाच नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने एवढी सोय करूनही कोरोनाचा कहर कमी झाल्याने नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
लसीकरण कमी होण्याचे कारण
ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाल्याने लस घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. शहरी भागात वेगवेगळ्या अफवांमुळे लस घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य विभागाकडूनही कुठल्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही.
लसीकरणाची गती मंदावली
जालना शहरात लस उपलब्ध असतानाही कोणी लस घ्यायला येत नसल्याने लसीकरणाचा वेग अचानक मंदावला आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला डोस मिळत नसल्याने रांगेतील लोक जात होते. शिवाय तरूणांनी लसीकरणाला वेग आणला होता. आता कोणीच लस घेण्यास येत नसल्याने किमान तरूणांना तरी लस देण्याची मागणी होत आहे.