आनंदवाडीत रंगला श्रीराम जन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:47 AM2018-03-26T00:47:38+5:302018-03-26T00:47:38+5:30
शहरासह जिल्ह्यात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह जिल्ह्यात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. येथील आनंदवाडी श्रीराम मंदिरात पालकमंत्री बबनराव लोणीकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी जन्मसोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी श्रीराम मंदिराचे प्रमुख रामदास महाराज आचार्य यांनी राम जन्मोत्सवाचा सोहळा प्रवचनातून उपस्थितांसमोर मांडला. भाविकांना राम जन्माचे महत्त्व तसेच प्रभू रामचंद्रांचे कार्य या विषयावर सविस्तर विवेचन केले. दुपारी बारा वाजता रामभक्तांच्या अलोट गर्दीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. नवीन जालन्यातील शेलगावकर, तसेच जुन्या जालन्यातील गवळी मोहल्लास्थित सागर देशमुख यांच्या राम मंदिरात परंपरागत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. गवळी मोहल्ल्यातीलच पक्षराज यांच्या राम मंदिरातही दुपारी जन्मोत्सव परंपरागत उत्साहात पडला. यावेळी रामनगर तसेच बडीसडकवरील राम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील पंडित मनोज महाराज गौड यांनी जन्मोत्सवावर विशेष प्रवचन दिले. एकूणच गुलाल आणि फुलांची उधळण करत भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. आनंदवाडी राम मंदिरात जन्म सोहळ्या नंतर परिसरातून पालखी मिरणूक काढण्यात आली होती. गेल्या सप्ताहभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साही वातावरणात पडले. रणरणत्या उन्हात भाविकांची राम जन्म सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामीण भागातही रामजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.