श्रीराम मंदिर निधी संग्रह समर्पण अभियानाची शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:37+5:302021-01-17T04:26:37+5:30
२३०० पुरुषांसह ७०० महिलांचा सहभाग परतूर : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा, यासाठी भारत देशात ...
२३०० पुरुषांसह ७०० महिलांचा सहभाग
परतूर : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा, यासाठी भारत देशात १५ जानेवारीपासून मंदिर निर्माणाच्या अभियानाची सुरुवात झाली आहे. याच आनुषंगाने परतूर शहरात शोभायात्रा काढण्यात आली.
सकाळी १० वाजता रेल्वे गेटपासून लेझीम पथकाद्वारे तर शहरातील महादेव मंदिर चौक, शिवाजीनगर चौक, तहसील चौक, पोलीस स्टेशन चौक, दसमले चौक व नारायण दादा पवार चौकात विविध प्रात्यक्षिकांद्वारे तरुणांनी या शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मंदिर निर्माणाच्या या शोभायात्रेत पुरुषोत्तम श्रीरामाच्या, सीतेच्या वेशभूषेतील शाळकरी मुले, मुली तसेच श्रीरामाच्या प्रतिमेचा फुलांनी, पुष्पहारांनी सजवलेला रथ शहरातील रामभक्तांचे लक्ष वेधून घेत होता. शहरातील महिला-पुरुष भक्तीचा भाव घेऊन श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले. या शोभायात्रेत शहरातील २३०० सज्जनशक्ती, संत, धर्माचार्य, सद्भाव यांच्यासह तब्बल ७०० मातृशक्ती अशा तीन हजार जणांनी यात्रेत सहभाग घेतला होता. चौका- चौकात राजस्थानी मित्रमंडळ, गायत्री परिवार मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, रामेश्वर मित्रमंडळ यांनी रामभक्तांसाठी पाणी, शरबत व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
शहरातील प्रत्येक रामभक्ताने स्वयंस्फूर्तीने सकाळी आपल्या घरासमोर सडा, रांगोळ्या काढल्याचे पाहून व यात्रेत सहभागी रामभक्तांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केल्याचे पाहून शहरातील अनेकांचे डोळे पाणावले. यात्रेप्रसंगी शहरातील स्वच्छता कर्मचारी, हमाल बंधू व शीख बांधवांकडून मंदिर निर्माण निधी घेऊन या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील संतांनी रामावरील विविध अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले. गावातील श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने रामभक्तांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती.