श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानावर आली अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 06:35 PM2017-07-18T18:35:30+5:302017-07-18T18:35:30+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला समस्यांनी वेढले आहे. हिरवळीवरील काटेरी झुडपे, सुरक्षा भिंतीला गेलेले तडे, अतिक्रमण यामुळे संपूर्ण उद्यानालाच अवकळा आली आहे.
ऑनलाईन लोकमत
जालना: शहराच्या मध्यवर्ती भागातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला समस्यांनी वेढले आहे. हिरवळीवरील काटेरी झुडपे, सुरक्षा भिंतीला गेलेले तडे, अतिक्रमण यामुळे संपूर्ण उद्यानालाच अवकळा आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सकाळी-सायंकाळी चिमुकल्यांबरोबर फिरता यावे, विरंगुळा व्हावा यासाठी फुलंब्रीकर नाट्यगृृहाला लागून मोकळ्या जागेत श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान तयार करण्यात आले. येथे नाना-नानी पार्क करण्याचे पालिकेचे अनेक वर्षांचे नियोजन अद्याप कागदावरच आहे.
उद्यानाची सद्य स्थिती पाहता येथे कधीकाळी नागरिक फिरण्यासाठी यायचे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. प्रवेशद्वारच नसल्यामुळे उद्यानात मोकाट जनावरांचा मुक्त संचार आहे. पादचारी रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकमधून काटेरी झुडपे वर येत आहेत. दोन्ही बाजूच्या मोकळी जागा बाभूळ, रुई, कडूलिंब या झाडांनी वेढली आहे. संपूर्ण उद्यानात बसण्यासाठी साधी सिमेंटची खुर्चीही नाही. सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे. डाव्या बाजूला उंचावरून पाणी पडण्यासाठी टाईल्स बसून पायºयांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या अर्धवर्तुळाकार जागेत मोठी झाडे उगली आहे. फर्शीही उखडली आहे. उद्यानातील हायमास्ट दिवेही बंद आहेत. सुुशोभीकरणाची कुठलीही संकल्पना उद्यानात राबविण्यात आलेली नाही.
अतिकमण वाढले
उद्यानाच्या समोरील बाजूस काहींनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत.परिणामी याचा त्रास आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही होता. शाळा सुटल्यानंतर कायम वाहतूक कोंडी होते.
सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
उद्यानाला लागूनच दोन शाळा व फुलंब्रीकर नाट्यगृह आहे. येथे चांगली व्यवस्था असेल तर नाट्यगृहात कार्यक्रमानिमित्त येणारे नागरिक व मुलाचा काही वेळ विरंगुळा होऊ शकतो. त्यामुळे उद्यानात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या.
- प्रशांत परदेशी, नागरिक