श्याम तोरी बन्सी की धून सुनी रे मैं, हो गई बावरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:17 AM2020-02-16T00:17:59+5:302020-02-16T00:18:10+5:30
श्याम तोरी बन्सी की धून, यासह अन्य शास्त्रीय गीतांनी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा शनिवारी श्रीगणेशा झाला.
जाकेर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : श्याम तोरी बन्सी की धून, यासह अन्य शास्त्रीय गीतांनी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा शनिवारी श्रीगणेशा झाला. यावेळी डॉ. प्रभू यांच्या सतार वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संस्कृती मंच आणि कलाश्रीसंगीत मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे उद्घाटन विनयकुमार देशपांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश मगरे, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर, सुधाकर जाधव, अॅड. सुनील किनगावकर, साहित्यिका रेखा बैजल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रास्ताविक शरद दाभाडकर यांनी केले. विनयकुमार देशपांडे यांनी संगीताचे जीवनातील स्थान व महत्त्व विशद केले. तर साहित्यिका रेखा बैजल यांनी इतर प्राणीमात्रापेक्षा मानव हा कला आणि साहित्यामुळे वेगळा ठरतो, असे सांगितले. मान्यवरांचे रोप देऊन स्वागत केले.
या महोत्सवाची सुरूवात जालन्यातील ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री प्रभू यांच्या सतार वादनाने झाली. त्यांनी आपल्या सतार वादनात राग बिहाग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सतार वादनाला संकेत शार्दूल यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर पंडित पन्नालाल घोष पुरस्कार प्राप्त बासरीवादक दीपक भानुसे यांनी आपल्या बासरीवादनात राग यमन सादर केला. त्यांना तबल्यावर नीलेश रणदिवे यांनी साथ दिली. रविवारी संगीत महोत्सवात झी सारेगामा कार्यक्रमात अंतिम दहामध्ये धडक मारणारी जालन्याची गायिका भक्ती पवार, सुधीर दाभाडकर व प्रख्यात सतार वादक पंडित रईसखांब यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर देशपांडे यांनी केले. शनिवारच्या मैफिलीची सांगता संत मीराबाई यांच्या भजनाने झाली.
पं.चव्हाण यांनी सादर केला गोरख कल्याण राग
पहिल्या दिवसाच्या महोत्सवाचे आकर्षण मूळ जालना येथील रहिवासी रूख्मिणी पुरस्कार, भोर पुणे येथील जीवन गौरव पुरस्कारप्राप्त आपल्या कार्यक्रमाचे सिंगापूर, अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम सादर करणारे ख्यातकीर्त गायक पंडित सुधाकर चव्हाण यांनी गोरख कल्याण राग सादर केला. त्यांना संदीप गुरव, सचिन बागवे, गंगाधर शिंदे, शाश्वती चव्हाण यांनी साथ दिली.