उन्हापासून थंडावा मिळविण्यासाठी पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 06:51 PM2019-05-13T18:51:44+5:302019-05-13T18:54:07+5:30
एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजूर (जालना ) : शेत तलावात पोहायला गेलेल्या दोन १६ वर्षीय युवकांचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची दुदैर्वी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी येथे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
चांधई ठोंबरी येथील प्रकाश रामभाऊ वाघमारे यांच्या गट क्रमांक २४४ मधील शेतात शेत तलाव तयार करण्यात आलेला आहे. सोमवारी दुपारी त्यांचा मुलगा आकाश प्रकाश वाघमारे (१६), गौरव प्रभु वाघमारे (१६) हे दोघे भावंड अन्य मित्रांसह शेत तलावात पोहायला गेले होते. त्यांनी तलावात खाली- वर ऊतरण्यासाठी ठिबकची नळी लावलेली होती. यामध्ये आकाशला पोहोता येत होते. तर गौरव पोहने शिकत होता. दोघेही नळीच्या मदतीने पाण्यात ऊतरले. गौरवला पोहोता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळया खावू लागला. आकाशने त्याला धरून ठिबकच्या नळीने वर येण्याचा प्रयत्न केला मात्र नळी तुटल्याने दोघांच्या जीवनाची दोरी तुटली.
यामधे गौरवने आकाशला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. तलावाच्या वर असलेल्या दोन ते तिन मित्रांनी दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरून तेथून पळ काढला. मुले पळत सुटल्याने आसपासच्या नागरिकांनी विचारणा केली असता, त्यांनी सदर घटना सांगीतली. काही ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेवून दोन्ही मुलांना वर काढले. परंतु तो पर्यंत त्या दोघांचाही करूण अंत झाला होता. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा करूण अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. ऊत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती.