मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला 

By दिपक ढोले  | Published: September 27, 2022 06:09 PM2022-09-27T18:09:58+5:302022-09-27T18:18:08+5:30

पोलिसांनी दोघा भावांसह त्यांच्या एका साथीदारास ताब्यात घेतले आहे

Siblings went to uncle's village and robbed the merchant | मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला 

मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला 

Next

जालना : मामाच्या गावाला जाऊन भावासह आणखी एका साथीदाराला घेऊन सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. कैलास कचरू गुढेकर (रा. राणी उंचेगाव, ता. घनसावंगी), पवन अशोक पाटोळे, किरण अशोक पाटोळे (दोघे रा. घाणेवाडी, ता. जालना) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चैनाचे २५ जोड व दुचाकी असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पवन आणि किरण हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर कैलास हा त्यांचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी पवन आणि किरण हे मामाचे गाव असलेल्या राणी उंचेगाव येथे गेले होते. त्याचवेळी त्यांनी कैलासला सोबत घेत एखाद्या व्यापाऱ्याला लुटण्याचा प्लॅन आखला. कैलासने माहिती काढली. अंबड तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सराफा व्यापारी ज्ञानेश्वर मैड हे आपल्या राणी उंचेगाव येथील दुकानात येत असल्याची माहिती कैलासने पवन व किरण यांना दिली. त्यांनी २३ सप्टेंबर रोजी लुटण्याचा प्लॅन आखला.

एका दुकानातून मिरचीची पावडर घेऊन पवन व किरण यांनी एका दुचाकीवरून सराफा व्यापारी ज्ञानेश्वर मैड यांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या पाठीमागे कैलासही दुचाकीवरून येत होता. पराडा पाटीजवळ आल्यावर त्यांनी सराफा व्यापारी ज्ञानेश्वर मैड यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. व त्यांच्याजवळ असलेली बॅग हिसकावून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील गुन्हा हा कैलास गुढेकर याने केला. 

या माहितीवरून पोलिसांनी त्याला राणी उंचेगाव येथून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांनाही घाणेवाडी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चांदीचे २६ चेनाचे जोड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, देविदास भाजने, भागवत खरात, कैलास चेके, धीरज भोसले यांनी केली.

Web Title: Siblings went to uncle's village and robbed the merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.