नागरिकांच्या मदतीने पकडला चोरटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:40 PM2017-11-26T23:40:36+5:302017-11-26T23:40:43+5:30
एका घरात चोरी करून गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपून बसलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले.
जालना : एका घरात चोरी करून गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपून बसलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले. शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहणारे विजय कोल्हे कुटुंबियांसोबत बाहेर गेले होते. परत आल्यानंतर कोल्हे यांना घराची कडी बाहेरून तुटलेली दिसली. घर उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा आतून बंद असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. हा प्रकार कोल्हे यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितला. आजूबाजूच्या नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला इन्कमटॅक्स कॉलनीत घरफोडी झाल्याची माहिती दिली. या वेळी शहरात गस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर पथकासह इन्कमटॅक्स कॉलनीत पोहोचले. पोलिसांनी आतून बंद असलेला दरवाजा तोडला. घरात कुणीच आढळले नाही. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आजूबाजूच्या घरांच्या छतावर पाहणी सुरू केली. या वेळी कोल्हे यांच्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीमागे एक जण अंधाराचा फायदा घेऊन लपून बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. शेख छोटू शेख दिलावर (३७, रा.पिंपळगाव बाग, ता. गेवराई,जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून, झडतीमध्ये त्याच्याकडे चोरलेला एक मोबाईल व ४१०० रुपये आढळून आले. या प्रकरणी विजय कोल्हे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शेख छोटू यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, सदाशिव राठोड, सोमीनाथ उबाळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, सचिन चौधरी, योगेश जगताप, विलास चेके यांनी ही कारवाई केली.