रेशीम कोष; ३९ हजारांचा विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:34 AM2018-11-20T00:34:56+5:302018-11-20T00:36:51+5:30
जालना: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे. सोमवारी रेशीम कोषाला विक्रमी भाव मिळाला असून प्रती क्विंटल ३९००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर कर्नाटकातील रेशीम बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी केंद्र दिवसेंदिवस खरेदीचा उच्चांक गाठत आहे. सोमवारी येथील रेशीम कोषबाजारपेठेत मराठवाड्यासह विर्दभातील पंधरा शेतक-यांनी ९ क्विंटल रेशीम विक्रीस आणले होते. चांगला दर, शेतकºयासाठी विविध सुविधा, आणि तात्काळ पैसे मिळत असल्याने दिवसेदिवस बाजारात रेशीम कोषाची आवक वाढत आज झालेल्या खरेदी - विक्रीच्या व्यवहारात कर्नाटकातील रामनगरम येथील रेशीमकोष बाजारापेक्षा तब्बल साडेतीन हजार रुपये दर जास्त मिळाल्याने शेतक-यांनी आनंद व्यक्त केला. रामनगरम येथील बाजारपेठेत सोमवारी ३५ हजार ५०० रुपये चांगल्या प्रतीच्या रेशीम कोषाला भाव मिळाल्याची माहिती आहे.
रेशीम विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ एप्रिल २०१८ पासून रेशीम कोष खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. आठ महिन्याच्या कालावधीत कालावधीत ६२० क्विंटल रेशीम कोषाची आवक झाली आहे. तब्बल १ कोटी ५२ लाख रुपयांची रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील रेशीमकोष उत्पादक शेतक-यांना पूर्वी रेशीमकोष विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील रामनगरम् येथे जावे लागत होते. भाषेची अडचण आणि वाहतुकीचा खर्च यामुळे रेशीमकोष उत्पादक शेतक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकºयांची अडचण ओळखून राज्यातील पहिली रेशीमकोष बाजारपेठ येथे सुरु करण्यात आली.
कर्नाटक राज्यातील रामनगरम येथील रेशीम बाजारात देण्यात येणा-या विविध सुविधा येथील रेशीमकोष केंद्रात देण्यात येत आहे. तसेच कोषाला योग्य भाव देण्यात येत असल्याने मराठवाड्यासह विर्दभातील यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांतील शेतकरी बाजार समितीत रेशीमकोष विक्रीस आणत आहेत. नगदी पीक म्हणून दिवसेंदिवस रेशीम कोष शेतीची ओळख वाढली आहे. शेतक-यांनी पारपंरीक शेतीला फाटा देत तुतीची लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
८ हजार हेक्टरवर रेशीम शेती करण्यात येत आहे.
३९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळालेले शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, आणि व्यापारी इम्रान पठाण यांचा बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्यावेळी रजनीकांत इंगळे, मोहन राठोड, अनिल खंडाळे, प्रभाकर जाधव, अशोक कोल्हे, गजानन जºहाड, शुभम पवार, भरत जायभाये, कृष्णा कापरे आदींची यावेळी उपस्थिती होती.