गणपतीची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रक्कम साफ; मंठा तालुक्यातील चिंतामणी मंदिरातील घटना
By महेश गायकवाड | Published: April 8, 2023 03:01 PM2023-04-08T15:01:23+5:302023-04-08T15:01:33+5:30
चोरट्यांनी दानपेटीबरोबरच मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती व एक चांदीचा घोडाही चोरून नेला.
मंठा : तालुक्यातील सरहद्द वडगाव येथील चिंतामणी गणपती मंदिरातील चांदीची गणपतीची मूर्ती व दानपेटीतील रक्कम गुरुवारी चोरी गेली आहे. जिल्ह्यात यापूर्वी श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील प्राचीन पंचधातूंच्या मूर्तींची चोरी झाल्यानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने आता मंदिरातील मूर्ती आणि दानपेट्याही असुरक्षित होत आहेत.
सरहद्द वडगाव येथील चिंतामणी गणपती मंदिरात ६ एप्रिल रोजी रात्री चोरांनी प्रवेश केला. त्यांनी मंदिरातील लोखंडी पत्र्याची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. या दानपेटीत अंदाजे २० हजार रुपयांची रक्कम असावी, असा अंदाज आहे. चोरट्यांनी दानपेटीबरोबरच मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती व एक चांदीचा घोडाही चोरून नेला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी बद्रीनाथ डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा तपास पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत.