लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:10 PM2024-07-12T14:10:33+5:302024-07-12T14:12:06+5:30
मनोज जरांगेंची विधीमंडळात आमदारांच्या गोंधळावर टीका
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : तुमची इच्छाशक्ती असेल तर द्या न आरक्षण, उगा विरोधक आले नाही म्हणून एकमेकांवर बोलू नका, आम्हीं ही बघू आरक्षण कसं मिळवायच. विधीमंडळात लहानपणापासून या आमदारांचा राडा बघतोय. सरकार आणि विरोधक दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर केली. आज जालना येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जालनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे सकाळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, हैद्राबादवरून गॅझेट आणलं अशी माहिती शंभुराजे यांनी दिली आहे. मागेल त्या मराठ्याला कुणबी नोंदीच्या प्रमाणपत्र त्या आधारे द्यावे. आम्ही शंभुराजे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व बांधवांची बैठक घेऊन २८८ जागांवर पाडायचे किंवा निवडून द्यायचे याचा निर्णय जाहीर करू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.
नुकसान झालं तर आता सहन करणार नाही
सगळीकडे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांनी देखील आता एकत्र यावे. जातीसाठी एकत्र या. जात प्रमाणपत्राची व्हॅलीडिटी दिली जात नव्हती. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही. याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करू नका आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही, ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. अधिकारी देखील जातीयवादी आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.