विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:14 PM2023-07-27T18:14:05+5:302023-07-27T18:14:42+5:30
मिरची विकून आलेले पैसे रस्त्यात पडले, शेतकऱ्याला माहितीही नव्हते
भोकरदन / धावडा : रस्त्यावर पडलेली शंभर रुपयांची नोट जर सापडली, तर ती नोट आपलीच आहे, असे म्हणत ते पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. चुकीने बँक खात्यावर जमा झालेली रक्कम काढून खर्च केल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, मतलबी दुनियेत आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. अशीच एक घटना शेलूद येथे घडली असून, नववीच्या विद्यार्थ्याला घरी जाताना रस्त्यावर सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला परत केले. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
शेलूद येथील अजिनाथ अंकुश जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सरस्वती विद्या मंदिर शाळेत ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी शाळा सुटल्यानंतर धावडा-पिंपळगाव रस्त्यावरून घरी जात असताना, त्याला रस्त्यावर पैसे पडलेले दिसून आले. या पैशासोबत मिरची विक्री केल्याचे एक बिलही होते. त्यावर शेलूद येथील मिरची उत्पादक शेतकरी सागर विठ्ठल गोमलाडू यांचे नाव होते. पैशासोबतच्या बिलावरून हे पैसे गावातील गोमलाडू यांचे असल्याचे त्याच्या लक्षात आले. ते पैसे त्याने गोलमाडू यांच्या घरी जाऊन परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांनी गुरुवारी त्याचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गाेलमाडू यांनी २६ जुलै रोजी मिरची तोडणी करून पिंपळगाव येथे व्यापाऱ्यास ६ हजार रुपये क्विटल दराने ८.10 क्विंटल मिरची विक्री केली. त्यातून त्यांना ४८,६०० रुपये मिळाले. त्यापैकी ६ हजार ६०० रुपयांचे मिरचीवरील औषधी खरेदी केली, व ४२ हजार रुपये घेऊन घरी येत होते. घाईघाईत येताना रस्त्यात ते पैसे पडले. जिवाचे रान करून कमावलेले पैसे अजिनाथच्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा परत मिळाले.
चांगले संस्कार
बाजारात मिरची विकून घरी आलो, हातपाय धुऊन घरात जात असतानाच, अजिनाथ व काही मुले घरी आली. त्यांनी तुमचे पैसे आम्हांला सापडले आहे, हे घ्या..असे म्हटल्यावर आधी मला काहीच कळाले नाही., कारण पैसे हरवल्याचे मला माहितच नव्हते. त्याआगोदर या मुलांनी पैसे आणून दिले. मुलाचे आई-वडील व शिक्षकांकडून चांगले संस्कार या मुलावर झाले, त्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने मला पैसे मिळाले. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी त्यांना ड्रेस व स्कूल बॅग घेऊन देणार आहे.
- संजय गोमलाडू