साहेब, दारूने ४ बळी घेतलेत; पोलिस महिन्याला हप्ता घेतात अन् दारू विक्रेता धमक्या देतोय!

By विजय मुंडे  | Published: July 9, 2024 05:16 PM2024-07-09T17:16:27+5:302024-07-09T17:17:12+5:30

अंबडगावच्या महिलांचा टाहो; पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या

Sir, alcohol has killed 4; Police take monthly installments and liquor seller is threatening! | साहेब, दारूने ४ बळी घेतलेत; पोलिस महिन्याला हप्ता घेतात अन् दारू विक्रेता धमक्या देतोय!

साहेब, दारूने ४ बळी घेतलेत; पोलिस महिन्याला हप्ता घेतात अन् दारू विक्रेता धमक्या देतोय!

जालना : साहेब, दारूमुळे चार जणांचा बळी गेला असून, 'ती' कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव दिलाय. राज्य उत्पादन शुल्क काही करीत नाही. बदनापूर पोलिस तर महिन्याला पाच हजार रूपये घेत असल्याचे सांगत अवैध दारूविक्रेता आम्हाला धमक्या देतोय! आमच्या मुलांचं आयुष्य उद्धवस्त होतेय. साहेब, काही करा पण गावातील अवैध दारूविक्री बंद करा, असा आर्त टाहो अंबडगाव (ता.बदनापूर) येथील महिला, मुलींसह वयोवृद्ध महिलांनी सोमवारी पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे घातला.

केवळ एक हजार लोकसंख्येच्या अंबडगावातील एक दोन नव्हे चार जणांचा दारू पिण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिला, ग्रामस्थांनी केला आहे. त्या चौघांच्या मृत्यूमुळे संबंधितांची कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. आता गावातील युवा पिढीही दारूच्या आहारी जात असून, त्यांचे भविष्य अंधारात जाणार आहे. या बाबीमुळे चिंतीत असलेल्या गावातील महिलांनी गत काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री बंद व्हावी, यासाठी लढा उभा केला आहे. ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडून तक्रार करण्यात आली. महिलांचा आक्रमकपणा पाहता ग्रामपंचायतीनेही कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली. परंतु, बदनापूर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याची तक्रार यावेळी महिला, नागरिकांनी केली. महिला, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधितांना नियमित कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

दारू दुकानदार तलवारीची भाषा करतो
अवैध दारूविक्री बंद करण्यास सांगितल्यानंतर तो दारूविक्रेता तलवारीची भाषा करीत असल्याचा आरोप महिलांनी केला. आमच्यापैकी कोणाला काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असा थेट इशाराही आंदोलक महिला, मुलींसह युवकांनी दिला.

Web Title: Sir, alcohol has killed 4; Police take monthly installments and liquor seller is threatening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.