"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 06:14 PM2024-07-17T18:14:59+5:302024-07-17T18:21:17+5:30
फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल
- पवन पवार
वडीगोद्री( जालना): फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला, तुम्हाला राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का ? नेमकी तुमचं काय चाललं हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. फडणवीस साहेब, तुमचे पण सोयरे आहे राज्यात. आम्ही त्रास देत नाही त्यांना. एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय. मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं अन् ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, असा फडणवीस साहेबांचा डाव दिसतोय. फडणवीस यांनी इतके 'छिछोरे' चाळे का करायला पाहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांने महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही,परत म्हणता मला टार्गेट केल जात. तूम्ही वागतात तसे. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. आज आमच्यावरच वेळ आली आहे फडणवीस साहेब. एक महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, पण २० जुलै रोजीपासून बेमुदत उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. यावेळी उपोषण कठोर करणार आहे.
मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही
प्रकाश आंबेडकर साहेब, प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून विष घालतील म्हणायचे, तेच आज इतकं शॉकिंग वागत आहेत. आंबेडकर साहेब पण म्हणाले सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय मला आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आल पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो. विधानसभेला एकत्र यायला पाहिजे का यावर बोलताना जरांगे म्हणाले की, येणार आहे का नाही मला माहित नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्तव्य बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार. न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल.ते बोलायला तयार नाही, अंमलबजावणी रद्द करा म्हणतात हे अपेक्षीत नाही आम्हाला.