'साहेब, मदत साऱ्यांनाच मिळायला पाहिजे'; दानवेंवर शेतकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:40 AM2019-11-06T11:40:30+5:302019-11-06T11:43:44+5:30
प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला
- संजय देशमुख
जालना : यंदाचा साल गेल्या सालापेक्षा लई खराब चाललाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. आता अधिकारी आणि कर्मचारी शेतात पंचनामे करीत आहेत. मात्र, प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला. दानवेंसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
दानवे यांनी मंगळवारी सकाळी जालना तालुक्यातील दरेगाव शिवारालगत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येण्याचा आग्रह मंत्र्यांना केला. प्रारंभी दानवे यांनी कपाशी तसेच मका पिकांचे जे शेतात जास्त नुकसान झाले आहे. तेथे जाऊन पाहणी केली. एका महिला शेतकऱ्याने आम्ही ही जमीन गावातीलच एका शेतकऱ्याकडून भाडे पद्धतीने घेतली आहे, असे सांगितले. यावर दानवे यांनी संबंधित शेती मालक ढवले यांच्याशी चर्चा करून शेती कसणाऱ्या कुटुंबाला देखील शासकीय मदतीतून हिस्सा द्यावा, असे सांगितले. शेतातील पाहणी आटोपल्यानंतर दानवे यांनी दरेगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी विष्णू पिवळ या तरूण शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली. पंचनामे ज्या प्रमाणे होतील, तशी नुकसान भरपाई सर्वांनाचा मिळेल अशी ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याच्या वेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.
बँक व्यवस्थापकाची घेतली झाडाझडती
शेतकऱ्यांशी संवाद सुरू असतानाचा राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी दिली आहे. ती किती जणांनी मिळाली, असे विचारल्यावर अनेकांनी ती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुमची बँक कोणती असा सवाल दानवे यांनी करून थेट बँकेच्या अधिकाऱ्याला मोबाईलवरून संपर्क केला. यावेळी २८६ शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्याकडून दानवे यांनी मोबाईलचा स्पीकर आॅन करुन ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. अशांची यादीच वाचून घेतली. तसेच प्रशासनाने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच त्या पोहोचल्यामुळे आम्हाला फटका बसला. (लीड कमी मिळाली) असे सांगून हशा पिकविला.