तिरंदाज सख्ख्या बहिणींचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका; तेजलला रौप्य, तर प्रांजलची सुवर्णपदकावर मोहर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:27 PM2024-02-06T16:27:49+5:302024-02-06T17:34:24+5:30
राष्ट्रीय पातळीवर पदक पटकावल्याने जालन्याची उंचावली मान
- राहुल वरशिळ
जालना : शहरातील तिरंदाज (धनुर्विद्या) तेजल राजेंद्र साळवे हिने चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया युथ चॅम्पियन गेम्समध्ये रौप्य, तर स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने नाडियाड येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेत माय रिच डॅड्स अकॅडमीची विद्यार्थिनी प्रांजल राजेंद्र साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या दोन्ही बहिणींनी राष्ट्रीय पातळीवर पदक पटकावल्याने जालन्याची मान उंचावली आहे.
तेजलने यापूर्वी गोवा येथे झालेल्या थर्टी सेवन नॅशनल गेम्समध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले होते. तर आता तामिळनाडू येथे झालेल्या खेलो इंडिया युथ चॅम्पियन गेम्समध्ये तेजलने धनुर्विद्या प्रकारात अंतिम सामन्यात मजल मारली असून, तिची विश्वविजेती आदिती स्वामीसोबत लढत झाली. यात तिने रौप्यपदक पटकावले. तसेच गुजरात येथे झालेल्या केवडिया वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी चॅम्पियन स्पर्धेतही वैयक्तिक गटात रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली होती. तर राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेत प्रांजलने राज्याचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिने सांघिक खेळामध्ये सुवर्णपदक व वैयक्तिक स्पर्धेत दोन रजतपदकांची कमाई केली.
या कामगिरीमुळे दोन्ही बहिणींचे नाव देशभरात गाजले आहे. यापूर्वी तेजलने अनेक पदके पटकावली, तर प्रांजलची नुकतीच सुरुवात आहे. या दोन्ही बहिणींच्या पाठोपाठ भाऊ आदर्श राजेंद्र साळवेदेखील तिरंदाजी स्पर्धेत आपले नशीब अजमावत आहे. विशेष म्हणजे, धनुर्विद्या खेळाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानादेखील सर्वसामान्य कुटुंबातील जालन्यासारख्या भागातून तिरंदाज म्हणून दोन्ही बहिणी नावारूपास आल्या आहेत. तेजलला प्रशिक्षक प्रकाश दुसेजा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केला तेजलचा सत्कार
राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या तेजलचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सत्कार केला. तर या यशाबद्दल संस्थापिका ईश्वरी चव्हाण, मुख्याध्यापक विकास कदम, प्रिया नायर, क्रीडा शिक्षक सौगातो घोष, डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रीतेश भक्कड, डॉ. राजेश चव्हाण, प्रशिक्षक प्रकाश दुसेजा, दिनेश पवार, श्यामराव साळवे आदींनी तेजल व प्रांजलचे अभिनंदन केले आहे.
राेज आठ तास सराव सुरू
गेल्या चार वर्षांपासून धनुर्विद्या प्रकारात खेळत आहे. यापूर्वी अनेक राष्ट्रीय, राज्य, विभागीय स्तरावर चांगली कामगिरी करत पदके प्राप्त केली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी मी दिवसभरात राेज आठ ते दहा तास सराव करीत आहे. यासाठी माझ्या परिवाराचे सहकार्य मिळत आहे.
-तेजल साळवे, युवा तिरंदाज, जालना
तेजल साळवेची आतापर्यंतची कामगिरी
१. १८ वी वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा - रौप्य, कांस्यपदक
२. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा - सुवर्णपदक
३. पहिली खेलो इंडिया तिरंदाजी स्पर्धा - सुवर्णपदक
४. १९ वी वरिष्ठ राज्य तिरंदाजी स्पर्धा - रौप्यपदक
५. शालेय राज्य चॅम्पियनशिप स्पर्धा - रौप्यपदक
६. २०वी राज्य सबज्युनिअर तिरंदाजी स्पर्धा - रौप्यपदक
७. सबज्युनिअर राज्य तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा - कांस्यपदक