...तब्बल दोन तास खांबावर बसून माथेफिरूने तोडल्या विजेच्या तारा, गावक-यांनी काढली अवघी रात्र अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:28 PM2017-10-05T12:28:14+5:302017-10-05T13:09:45+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध बू. येथील एका माथेफिरुने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चक्क विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारा तोडल्या. परंतु, प्रसंगावधान साधुन विज कर्मचाऱ्यांनी तात्काळ विज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
जालना, दि. ५ : भोकरदन तालुक्यातील पारध बू. येथील एका माथेफिरुने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चक्क विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारा तोडल्या. परंतु, प्रसंगावधान साधुन विज कर्मचाऱ्यांनी तात्काळ विज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
पारध बू.येथील एक माथेफिरू संदीप शंकर तबड़े (वय २५) हा बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास महात्मा फुले नगर परिसरातील एका विजेच्या खांबावर चढला. या वेळी या खांबावरुण विज प्रवाह सुरु होता. वर चढताच संदीपने मोठ्या आवाजात ओरडून अर्वाच्य भाषेत शिव्या देणे सुरु केले. यावेळी खाली जमलेल्या जमावाने त्यास ख़ाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर त्याने आपले डोके जोरजोरात खांब्यावर आदळण्यास सुरुवात केली. या बाबत माहिती मिळताच विज कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान साधुन तात्काळ विज प्रवाह बंद केला.
विज प्रवाह बंद केल्या नंतर संदीपने मुख्य विजेच्या तारा तोडून टाकल्या. गांभीर्य ओळखून विज वितरणचे कर्मचारी रामदास लोखंडे यांनी खांबावर चढुन त्याला ख़ाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीपने ने त्यांना खाली ढकले. यावर जमावाने त्यास आगीची भीती दाखवली असता तो ख़ाली उतरला.
हे नाट्य जवळपास दीड ते दोन तास सुरु होते. संदीपच्या खाली उतरल्याने जमावाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी त्यांने तोडलेल्या विजेच्या तारामुळे गावाला अवघी रात्र अंधारात काढावी लागली. संदीपला ताब्यात घेऊन उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.